झिरो अटेंडन्सला खो
By admin | Published: June 2, 2017 12:21 AM2017-06-02T00:21:04+5:302017-06-02T00:21:04+5:30
यंदाचा बारावीचा निकाल अपेक्षेप्रमाणे बरा लागला. यात बहुतांश विद्यार्थी शालेय शिक्षणासोबतच शिकवणी वर्गाचाही साथ घेत होती.
लोकमत शुभवर्तमान : दहावीच्या निकालानंतर वाढणार लगबग
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : यंदाचा बारावीचा निकाल अपेक्षेप्रमाणे बरा लागला. यात बहुतांश विद्यार्थी शालेय शिक्षणासोबतच शिकवणी वर्गाचाही साथ घेत होती. परंतु काळानुरुप शाळेत नोंदणी करून फक्त शिकवणी वर्गाला जायचे हा फंडा या वर्षी विद्यार्थ्यांनीच मोडून काढल्याचे दिसत आहे. झिरो अटेंडन्स ही मनोप्रवृत्ती बदलत असल्याने येणाऱ्या काळात याचे चांगले प्रतिसाद पाहायला मिळतील यात दुमत नाही.
इयत्ता दहावीचा निकाल लागला ही कुजबूज सुरु होते, ती इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशासाठी. काही विद्यार्थी अकरावीला प्रवेश न घेता अन्यत्र व्यवसायीक अभ्यासक्रमाकडेही वळतात. अकरावीत आपल्या आवडत्या शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर शिक्षणाला किंवा त्या सत्राला सुरुवात होते. परंतु बऱ्याच पालकांचा किंबहुना विद्यार्थ्यांचा कल अशा शाळांमध्ये असतो की जिथे झिरो अटेंडन्सला प्राधान्य दिले जात असते.
मात्र या वर्षीच्या बारावीच्या निकालात ज्या शाळांमध्ये नियमित इयत्ता १२ वी चे वर्ग झाले, अभ्यासक्रम पूर्ण झाला व सराव परीक्षा यशस्वीपणे पार पडली. अशा शाळांचा निकालही उत्कृष्ट लागल्याचे दिसून आले. शाळेमध्ये प्रवेश घेऊन शाळेच्या तासिकेला, प्रात्यक्षिकांना गैरहजर राहणे, शाळेच्या विविध स्पर्धांपासून दूर राहून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होऊ शकतो ही धारणाच विद्यार्थ्यांनीच झिडकारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.
एकीकडे शासन जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून सर्वांगिण शिक्षण ही मुलभूत संकल्पना रूजू करीत आहे. यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक विकासावरही भर देत आहे. अशा स्थितीत झिरो अटेंडन्स या संस्कृतीला खतपाणी घालणे म्हणजे भविष्यातील पिढीला संकटात घालण्यासारखे आहे.
हीच बाब हेरून प्राचार्यांसह काही उमद्या शिक्षकांनीही झिरो अटेंडन्सला विरोध करून पालकांमध्ये जागृतीचे कार्य अविरत सुरु केले आहे. येणाऱ्या शैक्षणिक सत्रातही शाळेत प्रवेश घेऊन अन्यत्र शिक्षणाला किंवा शिकवणी वर्गाला जाणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसविता येईल असे वाटत आहे.
झिरो अटेंडन्स ही मनोप्रवृत्ती हळूहळू नष्ट झाली पाहिजे. विद्यार्थ्यांचा विकास शिकवणी वर्गातून नव्हे तर शाळेतूनच झाला पाहिजे. विद्यार्थ्यांचे मनोबल व शिक्षणाकडे त्यांचा कल शाळेतील उपस्थितीमुळे वाढला आहे. लालबहादूर शास्त्री विद्यालयातही झिरो अटेंडन्स या उपक्रमाला प्राधान्य देण्यात येत आहे.
- डी.व्ही. देशमुख,
प्राचार्य, शास्त्री विद्यालय, भंडारा.