दीड महिन्यात एसटीला १७ कोटी ८५ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:25 AM2021-06-05T04:25:37+5:302021-06-05T04:25:37+5:30
भंडारा : अत्यावश्यक सेवेतील प्रवासी वाहतूक वगळता संचारबंदीच्या काळात गेल्या दीड महिन्यांपासून एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. त्यामुळे एसटीला ...
भंडारा : अत्यावश्यक सेवेतील प्रवासी वाहतूक वगळता संचारबंदीच्या काळात गेल्या दीड महिन्यांपासून एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. त्यामुळे एसटीला १७ कोटी ८५ लाख ६० हजारांचे नुकसान सहन करावे लागले आहे. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी एसटी महामंडळातर्फे उत्पन्नवाढीसाठी मालवाहतूकही सुरू केली आहे. दररोज एसटीच्या आगारातून बस निघण्यापूर्वी सॅनिटायझरची फवारणी करून बसेस निर्जंतुकीकरण केल्या जात आहेत. दुसरीकडे प्रवाशांना कोरोनाबाबत जनजागृती करून मास्क, सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे. आगारातून बस निघण्यापूर्वी एकदा व बस आगारात आल्यानंतर बसेसचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. प्रवाशांना मास्क घातल्याशिवाय एसटीत प्रवेश नाही. त्यामुळे प्रवाशांकडूनही कोरोना नियमांचे पालन होत आहे.
एसटीने प्रवास करताय ना मग सॅनिटायझर घेतले ना अशी आठवण एसटीचे कर्मचारी करून देत आहेत. एसटीचा प्रवास आजही सुखरूप प्रवास असून एसटी महामंडळातर्फे चालक वाहकांचीही योग्य ती काळजी घेतली जात आहे. चालक-वाहकांनाही कर्तव्यावर असताना मास्क, सॅनिटायझरसह कोरोना नियमांचे पालन करीत आहेत. यासोबतच प्रवाशांनाही आवाहन केले जात आहे.
बॉक्स
ना मास्क ना सॅनिटायझर
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता एसटी बसेस सुरू झाल्या आहेत. मात्र तरीही कोरोनाचा धोका अद्याप गेलेला नाही. यामुळे एसटी महामंडळातर्फे प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर बंधनकारक केला आहे. यासोबतच प्रवाशांनी गर्दी न करता एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.
बॉक्स
प्रवासी घरातच...
संचारबंदीनंतर शासनाने नियमांमध्ये शिथिलता दिली असून आता एसटी महामंडळाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आता ५५ बसेस सुरू केल्या आहेत. यामध्ये नागपूर, गोंदिया, तुमसर,पवनी,साकोली,लाखांदूर मार्गांवर या बसेस धावत आहेत. त्यामुळे आता प्रवाशांनाही दिलासा मिळत असून प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे.
बॉक्स
दीड महिन्यांत दहा लाखांचा तोटा
जिल्हांतर्गत एसटी महामंडळाच्या सर्व बसेस फेऱ्या सुरू झाल्या असून जिल्ह्यात बाहेरील नागपूर, गोंदिया, तिरोडा मार्गावरही बसेस सुरू झाल्या आहेत. सुरक्षित प्रवास म्हणून एसटी प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. सॅनिटायझरची फवारणी होत असल्याने कोरोनातही एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जात आहे.
बॉक्स
भंडारा नागपूर मार्गावर अधिक प्रवासी
१) भंडारा-नागपूर मार्गावर सर्वाधिक प्रवासी आहेत. भंडारा हे जिल्ह्याचे ठिकाण आणि नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे केंद्र असल्याने भंडारा नागपूर मार्गावरच सर्वाधिक एसटी बसेस धावत आहेत. यामध्ये प्रवासी संख्याही जास्त आहे. शासनाच्या सूचनेनुसार लांब पल्ल्याच्या बसेस सुरू होण्याचा विचार केला जात आहे.
२) दूर अंतरावरील एसटीची वाहतूक सुरू झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने एसटीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. सध्या भंडारा विभागाच्या ५५ एसटी बसेस सुरू आहेत. त्यापैकी सर्वाधिक बसेस या नागपूर, गोंदिया मार्गावर धावत आहेत.
३) २२ प्रवाशांना बसण्याची परवानगी आहे. त्यात काही बसेसमध्ये १५ ते २० प्रवासी प्रवास करत असल्याचे चित्र आहे.
कोट
बस सुरू झाली आणि जिवात जीव आला...
१) मागील वर्षभरापासून एसटी बसेस कोरोना संसर्गामुळे बंद ठेवाव्या लागल्या होत्या. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने एसटी बसेस सुरू झाल्या आहेत. याचा मला मनापासून आनंद झाला. बस आगारातून बाहेर निघण्यापूर्वीच सॅनिटायझर केली जाते. प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहोत.
चालक, भंडारा आगार.
२) एसटी बसचा प्रवास हा आजही सुरक्षित प्रवास आहे. बसमध्ये मोजक्याच प्रवाश्यांना परवानगी असल्याने कोरोनाची कोणतीही भीती नाही. आम्ही स्वतः चालक,वाहक कोरोना नियमांचे पालन करुन प्रवाशांनीही मास्क, सॅनिटायझर वापरण्यास सांगत आहोत.
वाहक, भंडारा आगार