तालुक्यात १,१०० हेक्टर क्षेत्रातील धानपिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:36 AM2021-05-12T04:36:49+5:302021-05-12T04:36:49+5:30
लाखांदूर : गत १ मे व ८ मे रोजी तालुक्यात रात्रीच्या सुमारास झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने तालुक्यातील १,१०० हेक्टर ...
लाखांदूर : गत १ मे व ८ मे रोजी तालुक्यात रात्रीच्या सुमारास झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने तालुक्यातील १,१०० हेक्टर क्षेत्रातील धानपिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ६ गावांतर्गत झालेल्या नुकसानीची स्थानिक तालुका प्रशासनांतर्गत सर्वेक्षण व पंचनामे पूर्ण केल्याची माहिती तालुका कृषी विभागांतर्गत देण्यात आली आहे.
गत १ मे व ८ मे रोजी तालुक्यातील पिंपळगाव /को, चिचगाव, कन्हाळगाव, मडेघाट, पुयार व जिरोबा परिसरात मोठ्या प्रमाणात गारपिटीसह पावसाने हजेरी लावली होती. सदर नैसर्गिक आपत्तीने या क्षेत्रातील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदर नुकसानींतर्गत पीडित शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण व पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली होती.
तथापि, काही लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ शासन मदत देण्याचे निर्देश तालुका प्रशासनाला दिले होते.
त्यानुसार, स्थानिक तालुका प्रशासनातील ग्रामसेवक, कृषी सहायक व तलाठी यांच्या नेतृत्वात नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण व पंचनामे केले गेले. या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार, तालुक्यातील १,१०० हेक्टर क्षेत्रातील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान जवळपास ५०० हेक्टर क्षेत्रातील झाली आहे, तर उर्वरित क्षेत्रातील ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, यंदा रब्बी हंगामांतर्गत तालुक्यात ६ हजार ९५९ हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधेंतर्गत धानाची लागवड करण्यात आली. येत्या काही दिवसांतच धानाची कापणी सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, गत काही दिवसांपूर्वी धान कापणीच्या वेळेवरच गारपीट व पावसाने हजेरी लावल्याने, धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तथापि, गत खरीप हंगामात तालुक्यात अवकाळी पाऊस, पूर व कीडरोगाने धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. अशातच शेतकऱ्यांनी गत खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मोठ्या उमेदीने रब्बी धानाची लागवड केली होती. मात्र, रब्बी हंगामातही धान कापणीच्या वेळेवर गारपीट व पाऊस यांसारख्या संकटाने तालुक्यातील १,१०० हेक्टर क्षेत्रातील धानपिकाचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत तालुका प्रशासनाद्वारा नुकसानग्रस्त भागाच्या केलेल्या सर्वेक्षण व पंचनाम्यानुसार पीडित शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी तालुक्यातील पीडित शेतकऱ्यांनी केली आहे.
बॉक्स
नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण
१ व ८ मे रोजी तालुक्यात रात्रादरम्यान गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. सदर नैसर्गिक आपत्तीने तालुक्यातील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार, नुकसानग्रस्त भागातील धानपिकाचे सर्वेक्षण व पंचनामे तालुका प्रशासन व कृषी विभागांतर्गत पूर्ण केले गेले. त्यानुसार, तालुक्यातील १,१०० हेक्टर क्षेत्रातील धानपिकाचे नुकसान झाले आहे. त्या अंतर्गत ५०० हेक्टर क्षेत्रातील धानपिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक तर उर्वरित क्षेत्राची ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दीपक पानपाटील यांनी दिली.