१० महिन्यांत एसटीला ३.८० कोटींचा तोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:45 PM2018-02-03T23:45:40+5:302018-02-03T23:49:52+5:30
देवानंद नंदेश्वर।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या भंडारा विभागात येणाऱ्या सहा आगारातून १ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या १० महिन्यांत प्रवाशांकडून निव्वळ तिकिटातून ८८ कोटी ८४ लाख ८३ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. यात कर्मचाऱ्यांचे वेतन, बसेसची देखभाल, अवैध वाहतूक, डिझेल, टोलटॅक्स आदीवरील खर्च वगळता विभागाला ३ कोटी ८० लाख ३९ हजार रूपयांचा तोटा झालेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पन्नामध्ये ३ कोटी ५२ लाख रूपयांमध्ये वाढ झाली असली तरी विभाग तोट्यात गेला आहे.
राज्यातील प्रवाशांचा भार आपल्या उरावर वाहणाऱ्या एसटीची संपूर्ण राज्यात आर्थिक परिस्थिती केविलवाणी झाली आहे. यापासून भंडारा विभाग देखील सुटले नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भंडारा विभागातर्फे भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्याचा समावेश आहे. यात भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, पवनी, तिरोडा असे एकूण सहा आगार आहेत. यासह भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा, पवनी, लाखांदूर, आमगाव, देवरी, लाखनी, मोहाडी, गोरेगाव व अर्जूनी (मोरगाव) या १३ ठिकाणी बसस्थानके आहेत. तसेच भंडारा विभागातंर्गत ५९ प्रवासी निवारे आहेत. अकोला, शेगाव, वाशीम, परतवाडा, उमरखेड, माहूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, नांदेड, औरंगाबाद, छिंदवाडा, बुलढाणा आदी शहरापर्यत लांब पल्ला वाहतूक चालविण्यात येते.
भंडारा विभाग अंतर्गत भंडारा-साकोली, साकोली-लाखांदूर, साकोली-मोरगाव अर्जूनी, तिरोडा-गोंदिया, गोंदिया-आमगाव, पवनी-लाखांदूर, भंडारा-तुमसर या मार्गावर अवैध प्रवासी वाहनांच्या वर्दळीमुळे महामंडाळाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. भंडारा विभागाला एप्रिल २०१७ ते मार्च २०१७ या १० महिन्यांच्या कालावधीत ८८ कोटी ८४ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. यात भंडारा आगाराला १९ कोटी ३६ लाख, गोंदिया १८ कोटी ३९ लाख, साकोली १८ कोटी ८६ लाख, तिरोडा ९ कोटी १६ लाख, तुमसर १६ कोटी २१ लाख तर पवनी आगारात ६ कोटी ८४ लाख रूपयांचा समावेश आहे. मागीलवर्षी डिसेंबरपर्यत भंडारा विभागाला ८५ कोटी ३२ लाखांचे उत्पन्न झाले होते.
मागीलवर्षी डिसेंबरपर्यत १० महिन्यात भंडारा आगाराला १८ कोटी ७५ लाख, गोंदिया १८ कोटी ३५ लाख, साकोली १८ कोटी १५ लाख, तिरोडा ८ कोटी ६० लाख, तुमसर १५ कोटी ०६ लाख तर, पवनी आगाराला ६ कोटी ३८ लाखांचे उत्पन्न अधिक मिळाले होते.
मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पन्नामध्ये ३ कोटी ५२ लाखांनी वाढ झालेली आहे. उत्पन्नात वाढ झाली असली तरी डिझेल, टोलटॅक्स, कर्मचारी व इतर खर्च वगळता भंडारा विभागाला ३ कोटी ८० लाखाचा फटका सहन करावा लागला.
आगारनिहाय उत्पन्न
भंडारा आगाराला १९ कोटी ३६ लाख, गोंदिया १८ कोटी ३९ लाख, साकोली १८ कोटी ८६ लाख, तिरोडा ९ कोटी १६ लाख, तुमसर १६ कोटी २१ लाख तर पवनी आगारात ६ कोटी ८४ लाख रूपयांचा समावेश आहे.