जलवाहिनी लिकेजमुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:06 PM2017-08-25T23:06:49+5:302017-08-25T23:07:14+5:30
खासगी कंपनीमार्फत सुरू असलेल्या भूमिगतपणे केबल घालण्याच्या कामामुळे गावातील नळाची जलवाहिनी फुटली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : खासगी कंपनीमार्फत सुरू असलेल्या भूमिगतपणे केबल घालण्याच्या कामामुळे गावातील नळाची जलवाहिनी फुटली. यामुळे वरठी येथील अनेक भागात ऐन पावसाळ्यात दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. पंधरा दिवसापासून वरठी येथील अनेक भागात नळाला पाणी नाही.
जलवाहिनी फुटूनही ग्रामपंचायत मार्फत दुरुस्ती न झाल्यामुळे अनेक भागात दररोज शेकडो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. तर दुरुस्ती करीत खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे.
१५ दिवसांपूर्वी वरठी येथील मुख्य मागार्ला लागून एका खासगी कंपनीने भूमिगतपणे केबल घालण्याचे काम केले. याबाबद मात्र ग्रामपंचायत स्तरावर परवानगी घेण्यात आली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. कामादरम्यान रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आलेली नळाची जलवाहिनी फुटली. जगनाडे चौक ते एस टी बस स्थानक पर्यंत च्या विविध भागांतील नळाची पाईप लाईन दरम्यान फुटली.
यामुळे वरठी येथील अनेक भागात नळाला पाणी येत नाही. एस टी स्टँड परिसरात १५ दिवसापासून नळाला पाणी येत नसल्याचे तक्रार येथील राहिवस्यानी केली आहे. याबाबद अनेकदा ग्राम पंचायत ला कळवण्यात आले पण अजूनही फुटलेल्या पाईप लाईनची दुरुस्ती करण्यात आली नसल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.
पाणी रस्त्यावर
फुटलेल्या जलवाहिनीमुळे शेकडो लीटर पिण्याचे पाणी वाया जात असून त्या पाईप द्वारे अशुद्ध पाणी लोकांना मिळत आहे. फुटलेल्या जलवाहिनीमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर जात आहे. एस टी स्थानक च्या मागच्या भागत असलेल्या जलवाहिनीमधून दररोज शेकडो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. नळाचे पाणी सुरू असताना जलद प्रवाहाने पाणी जमिनीच्या बाहेर पडते. नळ बंद झाल्यावर जमिनीचे संपूर्ण माती त्या पाईप लाईन द्वारे नळाला येते. परिणामी अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे.
दुरुस्तीचे काम लवकर होणार
फुटलेल्या जलवाहिनीचा शोध सुरू आहे. खासगी कंपनी मार्फत कोणतीही पूर्व सूचना किंवा परवानगी न घेता केबालिंग केल्यामुळे जलवाहिनी फुटली असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. लिकेज भूमिगत असल्यामुळे शोधण्यात वेळ जात आहे. त्यामुळे कसरत होत आहे. गावकर्यांनी यानंतर त्यांच्या भागात अशी काम सुरू असल्यास मज्जाव करण्याचे आवाहन सरपंच संजय मिरासे यांनी केले आहे. लिकेज दुरूस्तीचे काम पूर्ण करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
ते खड्डे धोकादायक
फुटलेल्या जलवाहिनी दुरुस्ती करीता ग्राम पंचायतीच्या मागच्या भागात रस्त्यावर दोन तीन ठिकाणी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. १५ दिवसापासून खोदलेल्या या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे ते खड्डे धोकादायक ठरत आहेत. विशेष म्हणजे या भागात सुप्रसिद्ध दुर्गा व हनुमान मंदिर आणि शाळा महाविद्यालय आहेत. दररोज शेकडो विद्यार्थी आणि गावातील भाविक यांच्यासाठी एकमेव रास्ता आहे. रस्त्याच्या मधोमध आणि मंदिराच्या समोरासमोर खड्डे खोदल्यामुळे रहदारीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या भागात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि नवप्रभात महाविद्यालय आहे. हे खड्डे धोकादायक ठरत आहेत.