‘डीजिटल ट्रान्समीटर’ सुविधेला ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:35 IST2017-11-23T23:34:47+5:302017-11-23T23:35:07+5:30
नागपुरसह मुंबई दूरदर्शन प्रक्षेपण केंद्राचे कार्यक्रम बघता यावे, यासाठी भंडारा जिल्ह्याच्या मुख्यालयी दुरदर्शन लघु प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आले.

‘डीजिटल ट्रान्समीटर’ सुविधेला ‘खो’
इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नागपुरसह मुंबई दूरदर्शन प्रक्षेपण केंद्राचे कार्यक्रम बघता यावे, यासाठी भंडारा जिल्ह्याच्या मुख्यालयी दुरदर्शन लघु प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आले. मात्र प्रसार भारतीचे अक्षम्य दुर्लक्ष तथा लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील एकमेव दुरदर्शन केंद्राची अवस्था बिकट झाली आहे. या केंद्राचे रूपांतरण ‘डीजीटल टेरिस्ट्रीअल ट्रान्समीटर’ मध्ये करण्यात यावे, असा सूर उमटत आहे.
विशेष म्हणजे ‘लोकमत’ने २० नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित करताच आकाशवाणी व दुरदर्शन मुंबईचे उपमहानिर्देशक कामलीयाल व नागपूर येथील अभियांत्रिकी संचालकांनी या केंद्राची पाहणी केली. भंडारा शहरातील मेंढा परिसरात असलेल्या दूरदर्शन केंद्रात योग्य नियोजनाअभावी व शासकीय धोरणाच्या उदासीनतेचे लक्षण ठरत आहे. सदर प्रसारण केंद्राच्या निर्मितीसाठी तेव्हा लक्षावधी रूपयांचा खर्च करण्यात आला होता. आता पूर्ववत नवीन तंत्रज्ञान वापरून सदर केंद्र सुरू करण्यात आल्यास शेतकरी, व्यवसायिक, युवकांना प्रबोधन करणारे ठरू शकते. त्यामुळे हे केंद्र अद्यायावत करून सुरू करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.
राज्यात उपेक्षित व मागास जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. नागपूर येथून प्रसारीत होत असणाºया कार्यक्रमांची जिल्ह्यात प्रसारीकरणासाठी ‘फ्रिक्वेन्सी’ योग्य प्रमाणात जिल्ह्यातील गाव खेड्यात पोहचत नसल्याने कार्यक्रमाच्या प्रसारीकरणाला व्यत्यय निर्माण होत होते. त्यामुळे जिल्ह्यात सॅटेलाईटची फिक्वेन्सी योग्य नसल्याने हे केंद्र १९९९ पासून सुरु केले आहे. तेव्हापासून २००७ पर्यंत दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारण सेवेचे व सह्यांद्री मुंबईचे कार्यक्रम चांगल्या प्रकारे दिसत होते. परंतू २००७ नंतर दूरदर्शनवरुन राष्ट्रीय कार्यक्रमाचे व सह्याद्री चॅनलचे कार्यक्रम बंद करुन फक्त दूरदर्शनचे न्यूज चॅनल दिसत आहेत.
आता ग्रामिण भागात व शहरातही आकाशवाणीचे कार्यक्रम दिसत नाहीत. त्यामुळे दूरदर्शनचे डिजिटल टेरिस्ट्रीअल ट्रांसमिटर लावून आकाशवाणी केंद्र सुरु करा अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांनी सुचना व प्रसारणमंत्री स्मृति इराणी तसेच आकाशवाणी व दूरदर्शन केंद्र मुंबई येथील मुख्य अभियंत्यांना निवेदनाव्दारे केली होती. याअंतर्गत दोन दिवसांपूर्वी आकाशवाणी व दुरदर्शन मुंबईचे उपमहासंचालक व नागपूर येथील अभियांत्रिकी महासंचालकांनी या केंद्राची पाहणी केली.
तर मिळेल सुविधा
भंडारा येथील दूरदर्शन केंद्र बंद न करता सदर प्रक्षेपण केंद्र ‘डिजिटलाईज्ड’ करण्यात यावे, जेणेकरून येथे आकाशवाणी कार्यक्रमाचे सादरीकरण व एफएम सुविधाही कार्यान्वित होण्यास मदत होईल, अशी मागणी एका शिष्टमंडळाने महासंचालकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर सुविधा कार्यान्वित झाल्यास आकाशवाणीसह एफएम फ्रिक्वेन्सीही सहज मिळेल.