नवेगाव तुमसर समितीच्या वतीने प्रेमविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:24 AM2021-06-24T04:24:11+5:302021-06-24T04:24:11+5:30
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती नवेगाव बुजतर्फे ग्रामस्थांच्या साक्षीने मंदिराच्या प्रांगणात प्रेमविवाह लावून देण्यात ...
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती नवेगाव बुजतर्फे ग्रामस्थांच्या साक्षीने मंदिराच्या प्रांगणात प्रेमविवाह लावून देण्यात आला. मुलाचे नाव जितेंद्र डुलीचंद मेश्राम (रा. नवेगाव बुज) तर मुलीचे नाव अश्विना भोजराम केवट (रा. तुमसर (बालाघाट) असे आहे.
जितेंद्र व अश्विना यांचे वर्षभरापासून एकमेकांवर प्रेम होते. दोघेही सजातीय असल्याने त्यांनी कुटुंबीयांकडे लग्नाची इच्छा व्यक्त केली. मुलीकडील मंडळींनी लग्नास नकार देत विरोध केला. मुलीस मुलापासून दूर राहण्याची तंबी दिली. परंतु कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता आठवड्यापूर्वी मुलीने आई-वडिलांचे घर सोडून मुलाच्या घरी आश्रय घेतला.
मुलाच्या कुटुंबीयांनी दोघांच्या प्रेमाचा स्वीकार करीत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडे लग्नासाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला. समितीने दोघांची विचारपूस करीत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून २३ जून रोजी मंदिराच्या प्रांगणात गावकऱ्यांच्या उपस्थितीत लग्न लावून दिले.
यावेळी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष चिंतामण तिबुडे, अनवर सपाटे, माजी उपसरपंच विजय बांते, कल्याणमित्र बांते, डुलीचंद मेश्राम, मारोती चकोले, जगन गोमासे, रामेश्वर तिबुडे, श्रीराम शेंडे, किशोर चामलाटे, अभिमान पचघरे, गोपाल बुद्धे, रवींद्र बारेवार, महिला व बालगोपाळ उपस्थित होते.