बोगस कंपनीत गुंतवणुकीचे आमिष; ११.४८ कोटी रुपयांनी केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 11:40 AM2024-09-26T11:40:33+5:302024-09-26T11:41:24+5:30
Bhandara : दोन आरोपींविरोधात लाखांदूर पोलिसांत गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : एका बोगस कंपनीत लाखो रुपयांची गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना दरमहा हजारो रुपयांच्या व्याजाची रक्कम उपलब्ध करण्याचे आमिष दाखवून ११ कोटी ४८ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.
या आरोपांतर्गत तालुक्यातील परसोडी नाग येथील अविराज जगन सावरकर (५२) नामक व्यक्तीच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी चंद्रपूर येथील कैलाश श्यामराव लांडगे (४०) व चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील संजय देवाजी हांडेकर (४३) नामक बोगस कंपनीच्या संचालक व सहसंचालकांविरोधात फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रानुसार, २०२२ मध्ये कैलाश लांडगे व संजय हांडेकर या दोघांनी अविराज सावरकर यांना गाठून आपण इन्फिनिटी अंपायर नामक कंपनीमध्ये संचालक व सहसंचालक पदावर कार्यरत असल्याची माहिती दिली होती. या कंपनीअंतर्गत फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना दरमहा हजारो रुपयांच्या व्याजाची रक्कम उपलब्ध करण्याची माहिती देण्यात आली होती. त्यावर विश्वास ठेवून अविराज यांच्यासह ३२३ व्यक्तींनी जुलै-२०२२ ते जानेवारी-२०२४ या काळात या कंपनीत ११ कोटी ४८ लाख ४० हजार २१ रुपयांची गुंतवणूक केली होती.
दरम्यान, या गुंतवणुकीनुसार सन २०२२ ते २०२४च्या जानेवारीपर्यंत सर्व गुंतवणूकदारांना दरमहा नियमितरीत्या हजारो रुपयांच्या व्याजाची रक्कम देण्यात आली. मात्र, मागील फेब्रुवारी महिन्यापासून गुंतवणूकदारांना व्याजाची रक्कम न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी संशय व्यक्त केला. त्या दोन्ही कथित संचालकांशी मोबाइलवरून संपर्क साधला मात्र, त्यांचे मोबाइल बंद असल्याचे लक्षात आले.
वारंवार संपर्क करूनही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने लाखांदूर पोलिसांत फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली. ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात आरोपींविरोधात विरोधात भादंविचे कलम ४२०, ४०६, ४१७, १२० (ब) सहकलम २१, २२ बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९, सहकलम ३, ४ महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.