तामसवाडी रेती घाटावरून यंत्राने रेती उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2016 12:48 AM2016-06-16T00:48:03+5:302016-06-16T00:48:03+5:30
वैनगंगा नदीपात्रातील तामसवाडी (सि.) रेती घाटावरून महसूल विभागाच्या आशीर्वादाने नियमबाह्यपणे पोकलँड मशीनने सर्रास रेतीचा उपसा सुरु आहे.
पर्यावरणाला धोका : जिल्हाधिकारी कारवाई करणार काय?
तुमसर : वैनगंगा नदीपात्रातील तामसवाडी (सि.) रेती घाटावरून महसूल विभागाच्या आशीर्वादाने नियमबाह्यपणे पोकलँड मशीनने सर्रास रेतीचा उपसा सुरु आहे. महसूल प्रशासनाच्या नियमानुसार यंत्राने रेती उपसा करता येत नाही. सध्या येथे रेती डम्पींग करणे सुरु आहे. वनविभागाच्या जागेवर डम्पींग केली जात आहे.
तामसवाडी रेती घाट महसूल प्रशासनाने लिलाव केला आहे. लिलावात महसूल प्रशासनाने यंत्राच्या मदतीने रेती उपसा करता येत नाही. अशी प्रमुख अट घातली आहे. परंतु येथे नदीपात्रात पोकलँड मशीनने सर्रास रेती उत्खनन करणे सुरु आहे. पावसाळा तोंडावर आल्याने नदी काठावरील वनविभागाच्या जागेवर डम्पींग करणे सुरु आहे.
संपूर्ण नदी पात्रात इतरही स्थळी पोकलँड मशीन सर्रास येथे दिसतात. नदी पात्र विस्तीर्ण असल्याने सीमा कुठून कुठपर्यंत आहेत हे समजत नाही. बाम्हणी, घाटकुरोडा घाट जवळ आहे. घाटकुरोडा नदीघटावरही पोकलँडने रेती उपसा सुरु आहे.महसूल विभागाचे अधिकारी नदीकाठावर गेले तेव्हा संबंधित लोक घाटकुरोडा घाटाकडे पळ काढतात व घाटकुरोडा घाटावर कारवाई सुरु केली तर तामसवाडी घाटाकडे पळ काढतात असा क्रम येथे सुरु आहे.
नदीपात्रतून मशीनने रेती उपशाकरिता रितसर जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी येथे कोणत्याच कंत्राटदारांनी घेतली नाही. जिल्हाधिकारी विशेष परिस्थितीत तशी परवानगी देवू शकतात. परंतु तशी स्थिती येथे नाही. तुमसर व तिरोडा तालुक्यातील शेकडो रेतीचे ट्रक तुमसर - भंडारा व नागपुरला धावतात. ही सर्व वाहने ओव्हरलोड असतात. परंतु त्यांच्यावर कारवाई अजूनपर्यंत झाली नाही.
येथे महसूल पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अर्थकारण दडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तामसवाडी (सि.) रेतीघाटावर नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले असून पोकलँड मशीनने मोठी नाली खोदकाम करण्यात आले आहे. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी येथे कारवाई करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)