मध्यप्रदेशातील सात्यांची तुमसरात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 01:13 AM2019-08-08T01:13:48+5:302019-08-08T01:14:18+5:30
ग्रामीणसह शहरी भागात सात्या-भोंबुड्या हे नाव सुपरिचित आहे. मंगळवारी मध्यप्रदेशातील तिरोडी, महकेपार जंगलातून मोठ्या प्रमाणात सात्या तुमसरात विक्रीला आल्या होत्या. श्रीराम नगरात मुख्य रस्त्यावर सात्या विक्रीची दुकाने होती. ३६० रूपये प्रति किलो असा सात्यांचा भाव होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : ग्रामीणसह शहरी भागात सात्या-भोंबुड्या हे नाव सुपरिचित आहे. मंगळवारी मध्यप्रदेशातील तिरोडी, महकेपार जंगलातून मोठ्या प्रमाणात सात्या तुमसरात विक्रीला आल्या होत्या. श्रीराम नगरात मुख्य रस्त्यावर सात्या विक्रीची दुकाने होती. ३६० रूपये प्रति किलो असा सात्यांचा भाव होता. खवय्यांची मोठी गर्दी येथे झाली होती. भाज्यांची राणी म्हणून सात्यांची ओळख आहे.
सात्याला मशरूम अळंबी असेही म्हटले जाते. आरोग्याकरिता अतिशय गुणकारी सात्यांना मानले जाते. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सीमावर्ती मध्यप्रदेशातील बालाघाट, वाराशिवनी, तिरोडी महकेपार येथून सात्या विक्रीला येतात. दरवर्षी लाखोंची उलाढाल होते. दोन्ही जिल्ह्यात सात्यांचा व्यापारही लाखोंच्या घरात आहे. पावसाळ्यात नैसर्गीक सात्या मोठ्या प्रमाणात विक्रीला आणल्या जातात. सध्या त्यांचा भाव ३६० रूपये किलोग्रॅम आहे. तरी सात्या खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडतात. सात्यांचे कृत्रिम पद्धतीनेही उत्पादन घेण्यात येते. त्याचे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात प्रकल्प आहेत, परंतु शेतातील डुंभरावर व जंगलातील डुंबरावरील नैसर्गीक सात्यांची चव वेगळीच असते. जुलै व आॅगस्ट महिन्यात ढगांचा गडगडाट झाला तर बांधावर व जंगलातील डुंभर फूटून त्यातील सात्या बाहेर येतात. अगदी लहान आकाराचे त्याचे बोंड असते. डुंबरातून उखडून त्यांना बाजारात विक्रीला आणतात.
शेतात काम करणारे तथा जंगलात फेरफटका मारणोर लोक पावसाळ्यात डुंबराकडे जावून सात्या शोधण्याचे काम करतात. याकरिता ते परिश्रम करतात.
सात्या काढणे धोकादायक
शेतातून तथा जंगलातून सात्या उखडून काढणे तसे अत्यंत धोकादायक काम आहे. सात्या काढताना अनेकदा सर्पदंश झाल्याच्या आणि काही जण यात मृत्युमुखी पडले आहेत. सात्या विक्रीतून कमाईपोटी अनेक जण ही जोखीची कामे ग्रामीण भागात करीत आहेत.
व्हिटॅमिनचे भांडार
सात्यामध्ये व्हिटॅमिनचे भांडार असते. यात प्रोटीन, व्हिटॅमीन, फायबर, अमीनो अॅसिड, झिंक, कॅलशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. शहरात नैसर्गिक सात्यांना प्रचंड मागणी आहे. तुमसर शहर व परिसरात सात्या विक्रीत लाखोंची उलाढाल दरवर्षी होते, हे विशेष.