लाखनी तालुक्यात मग्रारोहयो कामांना प्रारंभ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:27 AM2021-05-30T04:27:56+5:302021-05-30T04:27:56+5:30

लाखनी : तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ५० टक्के ग्रामपंचायत स्तरावरील कामाचे नियोजन करण्यात आले आहे. २०२१-२०२२ पर्यंत ...

Magrarohyo works will be started in Lakhni taluka | लाखनी तालुक्यात मग्रारोहयो कामांना प्रारंभ होणार

लाखनी तालुक्यात मग्रारोहयो कामांना प्रारंभ होणार

Next

लाखनी : तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ५० टक्के ग्रामपंचायत स्तरावरील कामाचे नियोजन करण्यात आले आहे. २०२१-२०२२ पर्यंत कामाचे नियोजन करून प्रत्येक नोंदणीकृत कामगाराच्या हाताला काम मिळावे, यासाठी प्रयत्न केले जात असतात.

तालुक्यात यावर्षी रोहयो कामांना प्रारंभ झाला नाही. केवळ वैयक्तिक स्तरावरील २७८ घरकुलाचे काम सुरू आहे. घरकुल कामावर १ हजार १९ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. मोठी कामे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रोहयो कामे पूर्णत: बंद केल्याने उन्हाळ्यात लोकांना मिळणारी मजुरी यावर्षी मिळणार नाही. २९ मे पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर रोहयो कामे सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

तालुक्यात १०४ गावे आहेत . यात महसुली गावे ९४ आहेत. पंचायत समिती अंतर्गत समाविष्ट ग्रामपंचायतीची संख्या ७१ आहे. स्वतंत्र ग्रामपंचायतीची संख्या ५६, तर गट ग्रामपंचायतीची संख्या १५ आहे. तालुक्यात रोहयोची नोंदणीकृत कुटुंबसंख्या ३२ हजार २८७ आहे. यात ४५१५ कुटुंबे अनुसूचित जातीची आहेत, तर १७४२ कुटुंबे अनुसूचित जमातीची आहेत. इतर मागासवर्गीय व इतर प्रवर्गाची २५ हजार ८२ कुटुंबे आहेत. तालुक्यात एकूण मजूर संख्या ८४ हजार ७१९ आहेत. यात महिला मजूर ४३ हजार ३१४ आहेत, तर पुरुष मजुरांची संख्या ४१ हजार ४७६ आहे. मागील वर्षी कोरोनाच्या संक्रमण व लाॅकडाऊनमुळे रोहयोची कामे मर्यादित प्रमाणात झाली, तर यावर्षी रोहयोच्या कामांना प्रारंभ झाला नसल्याने अनेक हातांना काम मिळाले नाही. अनेक मजूर शहरात कामासाठी स्थलांतरित होतात. त्यांनाही काम मिळाले नाही.

तालुक्यात रोहयोच्या नियोजनानुसार जलसंवर्धन अंतर्गत तलाव खोलीकरण, बोडी खोलीकरणाचे २७१ काम, नाला सरळीकरण १८४ काम, पाट दुरुस्ती, कालव्याचे गाळ काढणे १७३ काम, सिमेंट बंधारा गाळ काढणे २१२ काम मंजूर करण्यात आले आहे. कृषित्तोर कामामध्ये अंगणवाडी बांधकाम ३८, स्मशानभूमी सपाटीकरण, सौंदर्यीकरण ३११, शाळेचे क्रीडांगण व मैदान सपाटीकरणाचे २३२ कामांचे नियोजन केले आहे.

सामाजिक वनीकरण अंतर्गत ४१, वृक्ष लागवड ५७२ व फळबाग लागवडीचे १५३८ कामांचे नियोजन केले आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेत सिंचन विहीर बांधकाम १२४९ कामे मंजूर आहेत. भूसुधाराची मजगीची कामे ३५६०, पांदण रस्ते ३३१, नवीन रस्ते ४४ कामांचे नियोजन केले आहे.

केंद्राने ठरविलेल्या इतर कामांमध्ये कुक्कुट पालन शेड ९०१, शेळीपालन शेड ११६७, कॅटल शेड ३४१७, शोषखड्डा २९९०२, विहीर पुनर्भरण १३५५, नॅपिड टाकी ७३५, गांडूळ खत प्रकल्प ३७५, शौचालय बांधकाम ९९०, मत्स्यपालन टाकी २४, राजीव गांधी भवन ८ ,घरकुल बांधकाम ९६, शेततळे २१५ व इतर कामामध्ये १४५१ कामांचे नियोजन केले आहे.

तालुक्यात मग्रारोहयोमार्फत १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत ४९ हजार ११२ कामाचे नियोजन केले आहे. सदर कामावर २४ हजार २७६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

तालुक्यातील पिंपळगाव (सडक), सामेवाडा, पोहरा, केसलवाडा (पवार), किटाडी येथे लसीकरण व कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन केले आहे. या गावांत पुढील आठवड्यात रोहयो कामे सुरू होणार आहेत. त्यादृष्टीने तालुका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

कोट

पुढील आठवड्यापासून काही ग्रामपंचायतीने रोहयो कामाची तयारी दाखविली आहे . कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरण आवश्यक केले आहे. तसेच प्रत्येक व्यक्तींची कोरोना चाचणी घेतली जात आहे. जी व्यक्ती निगेटिव्ह आहे व त्यांचे लसीकरण झाले आहे, अशा व्यक्तींना रोहयो कामावर बोलविले जाणार आहे. रोहयो कामावर जाणे ऐच्छिक आहे. ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी तयारी दर्शविल्यानंतर कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.

डॉ. शेखर जाधव, खंड विकास अधिकारी, लाखनी

Web Title: Magrarohyo works will be started in Lakhni taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.