महालगाव शाळेची इमारत जीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:44 PM2019-07-29T22:44:46+5:302019-07-29T22:45:07+5:30
मोहाडी तालुक्यातील महालगाव येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली असून भिंतीलर तडे गेले असून कवेलूही फुटलेले आहे. ही इमारत केव्हाही कोसळू शकते. विद्यार्थ्याना ग्रामपंचायतीच्या इमारतीत शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे. या इमारतीची डागडुजी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मोहाडी तालुक्यातील महालगाव येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली असून भिंतीलर तडे गेले असून कवेलूही फुटलेले आहे. ही इमारत केव्हाही कोसळू शकते. विद्यार्थ्याना ग्रामपंचायतीच्या इमारतीत शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे. या इमारतीची डागडुजी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
महालगाव जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम १९४२ मध्ये झाले होते. आता या इमारातीला ७७ वर्षे होत आहे. येथे पहिली ते चवथीपर्यंत शाळा असून ४० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सध्या दोन शिक्षक कार्यरत आहेत. या धोकादायक इमारतीत अपघात घडण्याची भीती असल्याने आता महालगावची शाळा ग्रामपंचायती कार्यालयात भरविली जाते. स्वतंत्र्यापूर्वी बांधलेल्या या शाळा इमारतीच्या देखभाल दुरुस्तीवर अनेकदा खर्च करण्यात आला. मात्र या इमारतीची कालमर्यादाच संपली आहे. दुरूस्ती करूनही उपयोग होण्याची शक्यता नाही. दरम्यान इमारतीच्या दुरूस्तीसाठी महालगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ईश्वर ढबाले या इमारतीच्या दुरूस्तीसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीत त्यांना आश्वासन दिले. परंतु, अद्यापही इमारतीच्या डागडुजीला प्रारंभ झाला नाही. मात्र त्यांनी हिंमत सोडली नाही. शाळेची नवीन इमारत तयार होत नाही तोपर्यंत पाठपुरवा करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता, मोहाडीचे गटशिक्षणाधिकारी, कनिष्ठ अभियंत्यांनी शाळेला भेट दिली. त्यावेळी शाळेची इमारत मोडकळीस आलेली, लाकुड सडलेले, कवेलू फुटलेले आढळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना सदर इमारतीमध्ये बसविणे फारच धोक्याचे असल्याचे त्यांनी कबुल केले. तसेच ही इमारत दुरूस्ती करता येणार नाही. नवीन इमारत बांधकाम मंजूर करण्याकरिता शिक्षण सभापतींकडून प्रयत्न करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंत्यांनी आश्वासन दिले.
शाळा पाहणी दरम्यान सरपंच तुलाराम हारगुळे, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व गावकरी उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शाळेची नवीन इमारत मंजूर करावी अशी मागणी महालगाव ग्रामपंचायतचे सदस्य ईश्वर ढबाले यांनी केली आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने या शाळेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देऊन तात्काळ बांधकामस सुरूवात करण्याची गरज आहे. त्यातही विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी कामाला सुरूवात होणे गरजेचे आहे.
तलाठ्याने दिले इमारत जीर्ण असल्याचे पत्र
कोणत्याही निवडणुकीत महालगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान घेतले जायाचे. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तलाठ्याने शाळेची इमारत जीर्ण असल्याचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाºयाला दिले. त्यामुळे लोकसभेसाठी मतदार करण्यास महालगाववासीयांना एक किमी अंतरावरील मोरगाव जिल्हा परिषद शाळेत जावे लागले.