मोहाडी येथे महानुभाव साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:40 AM2021-09-23T04:40:22+5:302021-09-23T04:40:22+5:30
सामाजिक बंधूभाव, समता निर्माण करण्यात महंताचे योगदान आधुनिक काळात महत्त्वाचे आहे. तेव्हा श्री चक्रधर स्वामी यांचे अष्ठशतक व श्री ...
सामाजिक बंधूभाव, समता निर्माण करण्यात महंताचे योगदान आधुनिक काळात महत्त्वाचे आहे. तेव्हा श्री चक्रधर स्वामी यांचे अष्ठशतक व श्री गोविंदप्रभू महाराज यांचे जयंतीप्रीत्यर्थ उत्सव व द्वितीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन महंत कृष्णराजबाबा येळमकर यांचे हस्ते करण्यात आले. त्यांनी श्री चक्रधर स्वामींच्या सामाजिक कार्याचे प्रबोधन केले.
प्रमुख अतिथी म्हणून महंत लखा पतीबाबा यांनी श्री गोविंदप्रभू महाराजांच्या सामाजिक कार्याची सद्भक्तांना माहिती दिली. तसेच श्रीकृष्ण मंदिर तुमसरचे महंत खुशालमुनी कपाटे यांनी चक्रधर स्वामींचा उद्बोधक दृष्टांत सांगितला. यानंतर संमेलनात महानुभाव साहित्यामध्ये महिलांचे योगदान या विषयावर डाॅ. त. चंद्रप्रभा रामटेके तथा पैठणकर यांनी मार्गदर्शन केले.
महानुभाव साहित्य व तत्त्वज्ञानात सगतेचे विचार, शुद्ध आहार, व्यसनमुक्ती, अहिंसा, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छता, जातीय सलोखा, संवाद कौशल्य, समानता इ. अनेक बाबी असून सामाजिक कार्य व जातिभेद नष्ट करणारा हाच एकमेव महानुभाव समाज आहे. महाराष्ट्रात महानुभाव समाजात सर्व जातीचे २ कोटी सद्भक्त असून एकोप्याने वास्तव्य करून सामाजिक कार्य करीत आहेत. ते वंचित घटकाच्या विकासाकरिता कार्य करीत आहेत. परंतु अजूनही या महानुभाव कार्याची नोंद शासनाकडे नाही व शासनाकडूनसुद्धा महानुभाव समाजाचे वंचिताकरिता उत्कृष्ट कार्य करणारे महंत, साधू, तपस्वीनी, सद्भक्त यांना कोणताही समाजभूषण पुरस्कार दिल्या जात नाही. म्हणून शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन महानुभाव समाज भूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र शासन समाजभूषण डी. व्ही. बारमाटे यांनी व उपस्थित सर्व सद्भक्तांनी संमेलनात केली. हा ठराव संमेलनात एकमताने पारीत करण्यात आला. यानंतर महादाईसा महिला भजन मंडळ, तुमसर व श्री पंचकृष्ण भजन मंडळ, कन्हान यांच्याकडून भजन, कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सद्भक्तांना प्रबोधन करण्यात आले.
कार्यक्रमात प्रामुख्याने धर्मराजदादा साळकर, हिरा भवसागर, सुधाकर नागदेवे, देवराम कुलरकर, खुशाल कोसरे, कविता सेवलेकर, प्रतिभा बांबोले तसेच असंख्य महंत, साधू, तपस्वीनी, भिक्षुक, वासनिक आदी उपस्थित होते. संचालन मनोज उके व आभार रमेश बोंदरे यांनी केले.