भागवत कथा सांगायला महाराज गावात आले अन् विवाहितेला घेऊन धूम पळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 06:55 PM2020-02-07T18:55:41+5:302020-02-07T19:54:26+5:30
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; महाराज आणि पत्नीचा शोध सुरू
भंडारा : कथेच्या माध्यमातून आठवडाभर नैतिकेच्या कथा सांगणाऱ्या महाराजाने सप्ताह आटोपताच चक्क गावातील एका विवाहितेला पळवून नेल्याचा संशय नातेवाईकांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. भंडारानजीकच्या मोहदूरा येथे उघडकीस आलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांच्या मदतीने नातेवाईक महाराजाचा शोध घेत आहे.
भंडारा लगतच्या मोहदूरा येथे कथा सप्ताह कथाचे आयोजन करण्यात आले होते. कथावाचनासाठी सावनेर तालुक्यातील कुबडा येथील एका महाराजांना आमंत्रित करण्यात आले होते. कथा सप्ताहात महाराजांनी आपल्या रसाळ वाणीने गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. अशातच त्यांची नजर भागवतातील एका विवाहितेवर गेली. तिच्या कुटुंबियांशी जवळीक साधली. महाराजांचे या काळात घरी येणे-जाणे सुरू झाले. एकदाचा कथा सप्ताहाचा समारोप झाला आणि बुधवारी सायंकाळी गावातील एक विवाहिता बेपत्ता झाली.
सदर विवाहिता घरी नसल्याची माहिती होताच कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. मात्र थांगपत्ता लागला नाही. अखेर भंडारा पोलीस ठाणे गाठून विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यात कथावाचक महाराजाने पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला. त्यावरून पोलिसांनी नातेवाईकांना सोबत घेवून कुबडा गाव गाठले. मात्र महाराज गावात पोहचलेच नव्हते. शोधाशोध सुरू असून सदर महाराज वृंदावनला गेल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. पोलीस मोबाईल लोकेशनवरून महाराजाचा शोध घेत आहे.
मोहदूरा येथील एक विवाहिता बेपत्ता असल्याची तक्रार ठाण्यात प्राप्त झाली आहे. सदर तक्रारीत महाराजावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस महाराजांच्या गावापर्यंत जावून आले. परंतु थांगपत्ता लागला नाही. पोलीस पथक महाराजांचा व विवाहितेचा शोध घेत आहे.
-सुधाकर चव्हाण, ठाणेदार, भंडारा.