Maharashtra Election 2019 ; साकोलीतून डॉ.परिणय फुके यांना भाजपची उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 06:00 AM2019-10-04T06:00:00+5:302019-10-04T06:00:33+5:30
भंडारा जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावांचा सस्पेंस गुरुवारपर्यंत कायम होता. अखेर गुरुवारी सायंकाळी भाजपने केवळ साकोली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे डॉ. परिणय फुके यांना भाजपने उमेदवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : साकोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या नावाची घोषणा गुरुवारी सायंकाळी करण्यात आली. जिल्ह्याच्या राजकारणाला या निवडणुकीने नवे वळण मिळणार असून त्यांच्या उमेदवारीने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. शुक्रवार ४ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता ते नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.
भंडारा जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावांचा सस्पेंस गुरुवारपर्यंत कायम होता. अखेर गुरुवारी सायंकाळी भाजपने केवळ साकोली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे डॉ. परिणय फुके यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांच्या विकासकामांचा धडाडीवर विश्वास ठेवत भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांना साकोली विधानसभेच्या मैदानात उतरविले आहे. अद्याप काँग्रेसने अधिकृत घोषणा केली नसली तरी या मतदारसंघात काँग्रेसतर्फे माजी खासदार नाना पटोले यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागून राहणार आहे. जिल्ह्याच्या राजकारणाची सर्वसूत्रे गत काही दिवसांपासून डॉ. परिणय फुके यांनी हातात घेतली असून आता त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
विशेष म्हणजे नाना पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांच्यावर या दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी सोपविली. ही जबाबदारी स्वीकारत त्यांनी वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरविला. लोकसभा निवडणुकीत डॉ. परिणय फुके यांनी भाजपला भंडारा- गोंदिया मतदार संघातून एक हाती विजय मिळवून दिला. त्यात साकोली मतदार संघात मोठे मताधिक्क्य मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
अनेक ग्रामपंचायतीवर त्यांनी भाजपचा झेंडा रोवला. त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्री मंडळात स्थान देत दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री केले. पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच डॉ. फुके यांनी विकास कामांचा धडाका लावला. तणसापासून इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पापासून जिल्ह्यात विविध प्रकल्प आणि रस्त्याचे जाळे उभारले. बेरोजगारांचा हाताला काम देण्यासाठी उद्योग खेचून आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. दोन्ही जिल्ह्याचा विकास कामासाठी त्यांनी भरभरुन निधी दिला. त्यांच्यातील विकास कामाची तळमळ व नेतृत्व पाहून पक्षश्रेष्ठी त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरविले आहे.
शुक्रवारी ते आपल्या हजारो समर्थकांसह नामांकन दाखल करणार आहे. यावेळी खासदार सुनील मेंढे यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी समर्थकांच्या उपस्थितीत साकोली येथे रॅली काढण्यात येणार आहे.
जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा
काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यात भाजपने गत काही वर्षात मोठी मुसंडी मारली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय मिळविला. आता डॉ. परिणय फुके यांच्या उमेदवारीने साकोलीच्याच नव्हे तर संपूर्ण भंडारा जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत साकोली मतदार संघात रंगतदार लढत होणार असून संपूर्ण विदर्भाचे लक्ष या मतदार संघाकडे लागणार आहे.