Maharashtra Election 2019 ; विकासाच्या नावावर सर्वत्र अनागोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 06:00 AM2019-10-18T06:00:00+5:302019-10-18T06:00:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : राज्यातील शेती अर्थव्यवस्था उध्वस्त झाली आहे. उद्योग बंद पडत आहे. बेरोजगारांच्या हातांना काम नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : राज्यातील शेती अर्थव्यवस्था उध्वस्त झाली आहे. उद्योग बंद पडत आहे. बेरोजगारांच्या हातांना काम नाही. विकासाच्या नावावर देशात सर्वत्र अनागोंदी सुरु असून विद्यमान सरकार नावापुरतेच उरले आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांनी येथे केले.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे साकोली मतदारसंघाचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ गुरुवारी साकोली येथील होमगार्ड परेड ग्राऊंडवर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, माजी सभापती पद्माकर गहाणे, सभापती रेखा वासनिक, माजी सभापती मदन रामटेके, पंचायत समिती सदस्य छाया पटले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शत्रूघ्न सिन्हा म्हणाले, विद्यमान सरकारपुढे कोणतीही समस्या सांगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून केवळ ३७० कलम हटविल्याचे सांगतात आणि समस्यांकडे दुर्लक्ष करतात. केंद्र सरकार शेतकरी व कामगारविरोधी असून उद्योगपतींचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहेत. देशात ७० टक्के लोक शेती करतात. त्यांचा विचार न करता केवळ मुठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे. महाराष्ट्रात शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे. परंतु त्याविषयी उपाययोजना करायला सरकारला वेळ नाही. शेतकरी शेतमजुरांच्या समस्यांवर काहीच बोलत नाही. प्रत्येक प्रश्नाला सर्जीकल स्ट्राईक, बाला कोट, ३७० कलम हेच उत्तर देतात, असे शत्रूघ्न सिन्हा म्हणाले.
काँग्रेसने देशाला विचार दिला. विकासाची दिशा दाखविली. देशाची प्रगती करायची असल्यास काँग्रेसशिवाय पर्याय नाही. मात्र आता देशात लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही सुरू आहे. सरकारविरूद्ध कुणी बोलले की त्याचा आवाज दाबण्यासाठी विविध चौकशांच्या ससेमिरा लावला जातो, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. काँगे्रसला लोकांचे जीवनमान सुधारावयाचे आहे. त्यासाठी नवनवीन कारखाने सुरू करून शेतीला पुनर्जीवित करण्याची गरज आहे. हे सर्व काँग्रेसच करू शकते, असे ते म्हणाले.
यावेळी आनंद नंदागवळी, ओम गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य हेमराज कापगते, बाळू बावनकुळे, अंगराज समरीत, जिल्हा परिषद सदस्य मंदा गणवीर, अशोक कापगते आदी उपस्थित होते. संचालन अश्विन नशिने यांनी तर आभार संदीप बावनकुळे यांनी मानले.