Maharashtra Election 2019 ; निवडणूक अंतिम टप्प्यात गावागावांत प्रचार शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 06:00 AM2019-10-18T06:00:00+5:302019-10-18T06:00:44+5:30

भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघात २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात ३९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात तुमसर १०, भंडारा १४ आणि साकोली मतदार संघात १५ उमेदवार उभे आहेत. राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. प्रत्येकजण विजयासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.

Maharashtra Election 2019 ; In the final phase of the election, the campaign spread in the villages | Maharashtra Election 2019 ; निवडणूक अंतिम टप्प्यात गावागावांत प्रचार शिगेला

Maharashtra Election 2019 ; निवडणूक अंतिम टप्प्यात गावागावांत प्रचार शिगेला

Next
ठळक मुद्देप्रत्यक्ष भेटीवर भर : शहरी आणि ग्रामीण भाग निघाला ढवळून

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. १९ ऑक्टोबर रोजी प्रचारतोफा थंडावणार असल्याने गावन्गाव पिंजून काढण्याचा प्रयत्न उमेदवार आणि त्यांचे समर्थक करीत आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भाग ढवळून निघत आहे. गावागावांत प्रचाराची रणधुमाळी निर्माण झाली असून निवडणुकीत कोण विजयी होणार याचीच उत्सूकता आणि चर्चा प्रत्येक गावात दिसत आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघात २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात ३९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात तुमसर १०, भंडारा १४ आणि साकोली मतदार संघात १५ उमेदवार उभे आहेत. राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. प्रत्येकजण विजयासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. गावागावांत वाहनांवर ध्वनीक्षेपक लावून प्रचार केला जात आहे. उमेदवारांच्या रॅली काढून जनतेचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नेत्यांच्या सभा आयोजित करून आपल्या उमेदवारीचे समर्थन केले जात आहे.
भंडारा विधानसभा मतदार संघात १४ उमेदवार उभे असून त्यात महायुती, आघाडी, हिंजप, बमुपा, वंचित बहुजन आघाडी, बसपा यासह अपक्षांचा समावेश आहे. भंडारा मतदार संघात तिरंगी लढतीचे चित्र असले तरी येथे अपक्षांचा बोलबाला दिसत आहे. कवाडे गटाचे जयदीप कवाडे, आठवले गटाचे अरविंद भालाधरे अनुक्रमे काँग्रेस आणि भाजपच्याच चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. या दोघांपुढे अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. इतर अकरा उमेदवारही मतदार संघात मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन आपली भूमिका सांगत आहेत. तुमसर विधानसभा मतदारसंघात दहा उमेदवार असून येथे भाजप, राष्ट्रवादी, बमुपा, बसपा आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. तिकीट नाकारल्याने भाजपचे आमदार चरण वाघमारे यांनी बंडखोरी केल्याने येथे तिरंगी लढतीचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे, भाजपचे प्रदीप पडोळे अशी ही लढत होत आहे.
साकोली विधानसभा मतदार संघात १६ उमेदवार रिंगणात असून भाजप, काँग्रेस, बसपा, बळीराजा पार्टी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, जय महाभारत पार्टी, बहुजन वंचित आघाडी, पीपल्स पार्टी आॅफ इंडिया यासह अपक्ष रिंगणात आहेत. पालकमंत्री डॉ.परिणय फुके भाजपकडून तर नाना पटोले काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढत आहेत.
हेवीवेट लढतीत काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल केल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे. प्रचाराची सर्वाधिक रणधुमाळी साकोली मतदारसंघातील साकोली, लाखनी आणि लाखांदूर तालुक्यात दिसत आहे.
निवडणुकीने ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या उमेदवाराची प्रचार रॅली काढली जाते. उमेदवार मतांचा जोगवा मागताना दिसत आहेत. मात्र ग्रामीण भागातील जनतेच्या मनात काय आहे याचा अद्यापही अंदाज येत नाही.

निवडणुकीसाठी ६ हजार ३० मनुष्यबळ
जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी ६ हजार ३० मनुष्यबळ लागणार आहेत. त्यात मतदान केंद्राध्यक्ष १५०८, प्रथम मतदान अधिकारी १५०८ आणि इतर मतदान अधिकारी ३ हजार १५ यांचा समावेश आहे. यासोबतच सखी मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.

जिल्ह्यात ९ लाख ९० हजार मतदार
भंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात ९ लाख ९० हजार ६६५ मतदार आहेत. त्यात पुरुष ४ लाख ९८ हजार ८२४, महिला ४ लाख ९१ हजार ८४१ मतदारांचा समावेश आहे. तुमसर मतदार संघात ३ लाख १ हजार ७३० मतदारांमध्ये पुरुष १ लाख ५२ हजार ७७९, महिला १ लाख ४८ हजार ९५१ मतदार आहेत. भंडारा मतदार संघात ३ लाख ७० हजार ६९० मतदार असून त्यात पुरुष १ लाख ८५ हजार २१६ तर महिला १ लाख ८५ हजार ४७४ मतदार आहेत. साकोली मतदारसंघात ३ लाख १८ हजार २४५ मतदार असून त्यात १ लाख ६० हजार ८२९ पुरुष आणि १ लाख ५७ हजार ४१६ महिला मतदारांचा समावेश आहे. प्रशासनाच्या वतीने व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे.

जिल्ह्यात कुठेही रोकड पकडली नाही
विधानसभा निवडणुकीदरम्यान तीन ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत कोणत्याही ठिकाणी रोकड जप्त करण्यात आली नाही. तसेच कुणावर आचारसंहिता भंगाचाही गुन्हा नोंदविण्यात आला नाही. पोलीस मात्र रात्रंदिवस गस्त घालत आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019 ; In the final phase of the election, the campaign spread in the villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.