Maharashtra Election 2019 ; साकोली विधानसभा क्षेत्राचा विकास हेच माझे मुख्य ध्येय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 06:00 AM2019-10-18T06:00:00+5:302019-10-18T06:00:50+5:30
भाजपने विकास काय असतो ते पाच वर्षात जनतेला दाखवून दिला. ज्या क्षमतेने भाजपने विकास कार्य केले, ते कुणालाही करणे अशक्य होते. शेतकरी कर्जमाफीसह विविध मोठे निर्णय घेवून शासनाने अनेक लोकोपयोगी कार्य सुरू केले. त्याचा नागरिकांना मोठा लाभही होणार आहे. धान क्षेत्रामध्ये ईथेनॉलसारखा कारखाना सुरू करून रोजगार निर्मितीवरही भर दिला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : तळागाळातील विशेषत: शेवटच्या लाभार्थ्याला योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. याबाबत भाजपने नेहमी आग्रही भूमिका घेत शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी असाच प्रयत्न साकोली विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक वंचित, गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहचून त्यांना विकासाच्या गंगेत आणणे हेच माझे प्रथम कार्य आहे, असे प्रतिपादन साकोली विधानसभा क्षेत्राचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांनी केले.
लाखांदूर तालुक्यातील आसोला येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांची आथली, पाहुणगाव, डोकेसरांडी, किरमटी, परसोडी, दोनाड आदी गावांमध्येही प्रचारसभा घेण्यात आल्यात. साकोली मतदारसंघात धानासाठी कोठार नाही. सिंचनाची सुविधा नाही, आरोग्य सुविधा नाही, विजेचा प्रश्न कायम आहे, पिण्याचे पाणी, रस्ते, रोजगार अशा एक ना अनेक समस्या आहेत. या सर्व समस्या सोडवून या क्षेत्राचा सर्वांगिण विकास करण्याचे आपले ध्येय असल्याचे डॉ. फुके यांनी सांगितले.
भाजपने विकास काय असतो ते पाच वर्षात जनतेला दाखवून दिला. ज्या क्षमतेने भाजपने विकास कार्य केले, ते कुणालाही करणे अशक्य होते. शेतकरी कर्जमाफीसह विविध मोठे निर्णय घेवून शासनाने अनेक लोकोपयोगी कार्य सुरू केले. त्याचा नागरिकांना मोठा लाभही होणार आहे. धान क्षेत्रामध्ये ईथेनॉलसारखा कारखाना सुरू करून रोजगार निर्मितीवरही भर दिला जात आहे. कोट्यवधी रूपयांची कामे मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांचे गावागावांत स्वागत करून रॅली काढली जात आहे. यावेळी आमदार बाळा काशीवार, वसंत ऐंचिलवार, सरोदे महाराज, वामन बोदरे, नरेश खरकाटे, विनोद ठाकरे, नूतन कांबळे, भोजराज कापगते, सुनील भोवते, भारती दिवटे, हरीष वाघमारे, प्रियंका बोरकर, राजू नाकतोडे, नेहा वाघमारे, सोफिया पठान, विकास हटवार यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
ठिकठिकाणी जंगी स्वागत
पालांदूर : भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांचे साकोली विधानसभा क्षेत्रात जंगी स्वागत करण्यात आले. पालांदुरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी आमदार बाळा काशीवार, श्याम झिंगरे, पद्माकर बावनकर, म.वा. बोळणे, भरत खंडाईत, भोजराज कापगते, डॉ. नंदुरकर आदी उपस्थित होते.