Maharashtra Election 2019: भंडारा जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत तिरंगी लढतीचे चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 04:25 AM2019-10-12T04:25:58+5:302019-10-12T04:30:02+5:30
तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी बंडखोरी करत भाजपपुढे मोठ आव्हान उभे केले.
- ज्ञानेश्वर मुंदे
भंडारा जिल्ह्यातील सद्यस्थितीत तीनही जागा भाजपच्या ताब्यात असून विद्यामान तीनही आमदारांना तिकीट नाकारून भाजपने त्यांना मोठा धक्का दिला. तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी बंडखोरी करत भाजपपुढे मोठ आव्हान उभे केले. तर भंडारात शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर अपक्ष आणि साकोलीत काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये वंचित बहुजन आघाडीकडून लढत आहेत. एक विद्यमान आणि दोन माजी आमदार मैदानात उतरल्याने जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.
साकोली मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार राजेश काशीवार यांचे तिकीट कापून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसच्या किसान आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांना काँगे्रसने मैदानात उतरविले. दोन्ही पक्षाने हेवीवेट उमेदवार दिल्याने येथील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे काँग्रेसने तिकीट नाकारल्याने माजी आमदार सेवक वाघाये यांनी ऐन वेळेवर वंचित बहुजन आघाडीचा हात धरत मैदानात उडी घेतली आहे. येथील तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कुणाचे गणित बिघडविते, हे येथे महत्वाचे ठरणार आहे.
तुमसरमध्ये भाजपने विद्यमान आमदार चरण वाघमारे यांचे तिकीट ऐन वेळेवर कापले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आमदार वाघमारे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. पक्षश्रेष्ठींकडून आलेला दबाव झुगारून त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. तर काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीने राजू कारेमोरे यांना रिंगणात उतरविले आहे. भाजपपुढे बंडखोराने तगडे आव्हान उभे केले आहे.
भंडारा मतदारसंघ युती आणि आघाडीने मित्रपक्षासाठी सोडला आहे. युतीत रिपाइं आठवले गटाचे अरविंद भालाधरे तर आघाडीतर्फे पिरिपा कवाडे गटाचे जयदीप कवाडे रिंगणात आहे. शिवसेनेचा दावा असलेला हा मतदारसंघ मित्रपक्षाला सोडल्याने शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या उमेदवारीने या निवडणुकीला वेगळी दिशा मिळाली.
प्रचारातील चर्चेचे मुद्दे
केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास योजनांच्या मुद्यावर भाजपकडून निवडणूक लढविली जात आहे. कोट्यवधी रूपयांच्या विकास कामांचे दाखले दिले जात आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून बंद पडलेले उद्योग, धानाचे भाव, बेरोजगारी यावर भर दिला जात आहे.
साकोली मतदारसंघात भाजपचे डॉ. परिणय फुके विकासाचा मुद्दा घेवून जनतेपुढे जात आहे. सुरू न झालेला भेल प्रकल्प या निवडणुकीत भाजपने महत्वाचा मुद्या केला आहे. काँग्रेसचे नाना पटोले शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरत असून स्थानिक विकासाचा मुद्दा पुढे करीत आहे.
गोसे प्रकल्पग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन, सिंचनासाठी प्रकल्पाचे पाणी, नाग नदीमुळे दूषित झालेली वैनगंगा, शुद्ध पेयजल हे मुद्दे तीनही मतदारसंघात कळीचे ठरणार आहे. धानाच्या हमीभावाचा मुद्दाही या निवडणुकीत चर्चेत आहे.