Maharashtra Election 2019 : विकासाचा प्रश्न अन् गावपुढाऱ्यांची गोची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:00 AM2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:01:10+5:30
प्रचाराला केवळ पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. प्रत्येक उमेदवार स्वत: किती चांगले आणि इतर पक्ष किती वाईट, हेच सांगत सुटले आहेत. मात्र, आरोप-प्रत्यारोपांच्या या फैरी झडत असताना गावागावांतील मूलभूत समस्या मात्र अद्यापही जैसे थेच आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गावपुढाऱ्यांनी गावातील मूलभूत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या समस्या जैसे थेच आहेत. विविध प्रमुख पक्षांच्या स्वबळावर लढण्याच्या निणर्यामुळे गावपुढाºयांची गोची झाली आहे.
प्रचाराला केवळ पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. प्रत्येक उमेदवार स्वत: किती चांगले आणि इतर पक्ष किती वाईट, हेच सांगत सुटले आहेत. मात्र, आरोप-प्रत्यारोपांच्या या फैरी झडत असताना गावागावांतील मूलभूत समस्या मात्र अद्यापही जैसे थेच आहेत. अलीकडे मतदारही दूधखुळे राहिलेले नाहीत. ते दारात मत मागण्यासाठी आलेल्या उमेदवाराला ‘आधी विकासाचे बोला, मतांचे नंतर बघू’ असे खडे बोल सुनावत आहेत. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात ३९ उमेदवार रिंगणात आहेत. बंडखारीमुळे राजकीय वातावरण बदलले. स्वपक्षात उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी अन्य पक्षांचा झेंडा हाती घेतला. काही नवख्या उमेदवारांसाठी पक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समस्यादेखील नव्याच आहेत. या अवघड परिस्थितीत मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे.
प्रत्येक मतदारसंघात एमआयडीसी आहे. मात्र, उद्योग नाहीत, रस्ते नाहीत. दर्जेदार शिक्षण, शेतमालावर आधारित उद्योग, पाणीटंचाई, भारनियमन यांसह अनेक मूलभूत समस्या जैसे थे आहेत. यंदा चुरसदार निवडणूक लढविली जात असल्याने उमेदवारांची भाऊगर्दी आहे. हे उमेदवार मतदारांना आश्वासन देत आहेत. मात्र, मूलभूत समस्यांनी ग्रासलेले मतदार उमेदवारांना खडे बोल सुनावत आहेत.
आश्वासनांची पूर्तता होणार का?
अलीकडच्या काळात मतदार मोठ्या प्रमाणात जागृत झाला आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी रेकॉर्डब्रेक होण्याची शक्यता आहे. मतदानाचे महत्त्व मतदार जाणू लागला आहे. त्यामुळे उमेदवारांकडून आश्वासन नको आहे. उमदेवारांच्या आश्वासनावर त्याचे समाधान होत नसून आश्वासनांच्या पुर्ततेची मागणी तो करू लागला आहे.