Maharashtra Election 2019 ; आज निकाल, उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 06:00 AM2019-10-24T06:00:00+5:302019-10-24T06:00:34+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदार पार पडल्यानंतर सर्वांच्या नजरा गुरूवार २४ ऑक्टोबरकडे लागल्या होत्या. निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याने कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. प्रशासनाने मतमोजणीची जय्यत तयारी केली असून तुमसर येथे १४ टेबल, भंडारा आणि साकोली येथे प्रत्येकी २० टेबरलवर मतमोजणी होणार आहे.

Maharashtra Election 2019 ; Result today, curious | Maharashtra Election 2019 ; आज निकाल, उत्सुकता शिगेला

Maharashtra Election 2019 ; आज निकाल, उत्सुकता शिगेला

Next
ठळक मुद्दे२५७ कर्मचारी : तुमसरमध्ये १४ तर भंडारा व साकोलीत प्रत्येकी २० टेबलवर मतमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गत महिनाभरापासून सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची इतिश्री गुरूवारी होत असून तुमसर, भंडारा आणि साकोली येथे मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. तीनही मतदारसंघात मतमोजणीसाठी २५७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. कोण विजयी होणार याची प्रचंड उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदार पार पडल्यानंतर सर्वांच्या नजरा गुरूवार २४ ऑक्टोबरकडे लागल्या होत्या. निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याने कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. प्रशासनाने मतमोजणीची जय्यत तयारी केली असून तुमसर येथे १४ टेबल, भंडारा आणि साकोली येथे प्रत्येकी २० टेबरलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी २५७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात मतमोजणी पर्यवेक्षक आणि मतमोजणी सहायक प्रत्येक ७६ तर मॉयक्रो ऑब्झर्वर ६९ नियुक्त करण्यात आले आहे. ३६ अधिकारी, कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहे. मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे.
तुमसरमध्ये आयटीआय इमारतीत मतमोजणी
तुमसर येथील आयटीआय इमारतीत मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी १४ टेबलवर मतमोजणी होणार असून २६ राऊंड होणार आहेत. त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक व सहायक प्रत्येकी २० तर १९ मॉयक्रो ऑब्झर्वर नियुक्त करण्यात आले आहे. १२ कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहे. तुमसर मतदारसंघात दहा उमेदवार रिंगणात होते. त्यात भाजपचे प्रदीप पडोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे, बमुपाचे रविदास लोखंडे, बसपाच्या छाया गभने, वंचित बहुजन आघाडीचे विजय शहारे, अपक्ष चरण वाघमारे आदींचा समावेश होता. तुमसरमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भंडारा मतमोजणी वैनगंगा सभागृहात
भंडारा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी पोलीस मुख्यालय परिसरातील वैनगंगा सभागृहात होणार आहे. येथे मतमोजणीसाठी २० टेबल राहणार असून मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक प्रत्येकी २८ तर २५ मॉयक्रो ऑब्झर्वर नियुक्त करण्यात आले आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रात १४ उमेदवार रिंगणात होते. त्यात भाजपचे अरविंद भालाधरे, काँग्रेसचे जयदीप कवाडे, अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे विसर्जन चौसरे, बसपाचे दिलीप मोटघरे, हिंजपचे लक्ष्मीकांत बोरकर आदींचा समावेश आहे. येथे झालेल्या लढतीत कोण विजयी होणार याबाबत मतदारांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
साकोलीकडे सर्वांच्या नजरा
साकोली विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत झाली असून येथे कोण विजयी होतो याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात होते. त्यात भाजपचे डॉ. परिणय फुके, काँग्रेसचे नाना पटोले आणि वंचित बहुजन आघाडीचे सेवक वाघाये, बसपाचे डॉ. प्रकाश मालगावे, बळीराजा पार्टीच्या उर्मिला आगाशे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे गणेश खंडाते, जय महाभारत पार्टीचे पंकज खेडीकर, पिपल्स पार्टी ऑफ इंडियाचे संदीप रामटेके आदींचा समावेश आहे. साकोली येथे नवीन तहसील कार्यालयात मतमोजणी होत असून प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.

सर्वप्रथम टपाली मतपत्रिकांची मोजणी
विधानसभा निवडणुकीत सर्वप्रथम टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे. जिल्ह्यात नऊ हजार १७५ टपाली मतपत्रिका वितरित करण्यात आल्या आहे. मतदान पथक व इतर कर्मचारी आठ हजार २६६ असून त्यांनी टपाली मतदान केले आहे. यासोबतच जिल्ह्यात १६५४ सैन्य मतदार आहेत.

तगडा बंदोबस्त
जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणीच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले असून मतमोजणी कक्षाच्या परिसरात प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आला आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Result today, curious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.