Maharashtra Election 2019 ; साकोलीतील चोरीने तालुका बँकांची सुरक्षा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 06:00 AM2019-10-19T06:00:00+5:302019-10-19T06:00:52+5:30
अत्यंत वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावरील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरूवारच्या रात्री धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. बनावट चाबीने लॉकर आणि इतर कुलूपे उघडली. बँकेतील २४ लाख ५५ हजार रूपयांची रोख आणि चार किलो २०० ग्रॅम सोने असा एक कोटी ९२ लाखांचा मुद्देमाल लंपास झाला.
संजय साठवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तब्बल एक कोटी ९२ लाखांची चोरी उघडकीस आल्यानंतर तालुकास्तरावरील विविध बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तकलादू इमारती, सुरक्षा रक्षकांचा अभाव आणि कुचकामी ठरणारी सीसीटिव्ही यंत्रणा चोरट्यांसाठी चांगलेच फावत आहे. साकोलीच्या घटनेने बँकातील ग्राहकांची लाखोंची रोकड आणि गहाणातील सोने वाºयावर तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे.
अत्यंत वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावरील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरूवारच्या रात्री धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. बनावट चाबीने लॉकर आणि इतर कुलूपे उघडली. बँकेतील २४ लाख ५५ हजार रूपयांची रोख आणि चार किलो २०० ग्रॅम सोने असा एक कोटी ९२ लाखांचा मुद्देमाल लंपास झाला. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. तेव्हा शहरातच नव्हे तर जिल्ह्यात खळबळ उडाली. जिल्ह्यात आजपर्यंत एवढ्या मोठ्या रक्कमेची चोरी झाली नव्हती. जवळपास दोन कोटी रूपये हातोहाथ तेही बँकेच्या लॉकरमधून चोरट्यांनी लंपास केले. त्यामुळे बँकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विविध राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकाच्या शाखा आता तालुकास्तरावर आहेत. विशेष सुविधा नसतानाही बँकांनी आपल्या शाखा तालुकास्तरावर सुरू केले आहे. एखादी इमारत भाड्याने घेवून त्यात बँक थाटली जाते. तेथे सुरक्षेच्या कोणत्याही उपाय योजना नसतात. गावापासून दूर शाखा असतात. याठिकाणी दिवसभर याठिकाणी सुरक्षा रक्षक असला तरी रात्रीच्यावेळी येथे कुणीही नसते. सीसीटिव्हीच्या भरोशावर लाखो रूपयांची रोकड बँकांमध्ये असते. साकोली येथेही असेच झाले. रात्री कुणीही सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले. चोरट्यांनी कोणताही पुरावाही मागे ठेवला नाही. सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेला. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. मात्र तोही माग दाखवू शकला नाही.
जिल्हा पोलीस अधीक्षकांसह सर्वांनीच घटनास्थळी धाव घेतली. मात्र उशिरा रात्रीपर्यंत चोरट्यांचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नव्हता. साकोली येथील चोरीने तालुका ठिकाणावरील बँका किती असुरक्षित आहे, याचा अंदाज येतो. तालुकास्तरावरी बँकांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही उपाय योजना केल्या जात नाही. ग्राहकांचे लाखो रूपयांचे वाºयावर दिसतात.
विर्शी बँकेतील चोरीचा शोध नाही
साकोली तालुक्यातील विर्शी येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत वर्षभरापुर्वी चोरी झाली होती. चोरट्यांनी खिडकी तोडून आत प्रवेश केला. बँकेचे लॉकर बाहेर शेतात नेवून गॅसकटरच्या सहायाने तिजोरी फोडली. लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला. मात्र अद्यापही या चोरीतील चोरट्यांचा शोध लागला नाही. एक वर्ष होवूनही चोरी उघडकीस आली नाही. आता पुन्हा साकोलीत ही घटना घडल्याने पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
बनावट चाबीचे रहस्य काय
चोरट्यांनी साकोलीच्या बँकेतून बनावट चाबीच्या सहायाने लॉकरचे कुलूप उघडले. बनावट चाबी तयार करण्यामागे रहस्य काय, यात कुण्या बँकेतीलच व्यक्तींचा सहभाग तर नाही ना, असा संशय येत आहे. कोणत्याही बँकेत स्ट्राँग रूममध्ये अनोळखी व्यक्ती पोहचली की सायरन वाजतो. परंतु साकोलीच्या भर वस्तीत असलेल्या बँकेत चोरी करून चोरटे निघून गेले तरी सायरन वाजला नाही. बँकेचे व्यवस्थापक हलिंद्र बोरकर नियमित वेळेवर बँकेत आले तेव्हा चोरी झाल्याचे उघडकीस आले. यामुळे आता पोलीस नेमका कोणत्या दिशेने या घटनेचा तपास करतात आणि चोरटे कसे जेरबंद होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.