Maharashtra Election 2019 ; भाजपला नाकारत मतदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवाराच्या गळ्यात घातली विजयाची माळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 06:00 AM2019-10-25T06:00:00+5:302019-10-25T06:00:35+5:30
भंडारा मतदार संघात अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी एकहाती विजय संपादीत केला. भंडारा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा अशी त्यांची मागणी होती. मात्र महायुती आणि महाआघाडीने मित्रपक्षाला ही जागा सोडली. त्यामुळे भोंडेकर यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. कायम आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी लढणारे म्हणून भोंडेकरांची प्रतीमा आहे. त्यांच्यामागे तरुणांची मोठी फौज उभी होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भाजप उमेदवारांना पराभवाची धूळ चारत मतदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्षाच्या गळ्यात विजयाची माळ घातली. तुमसरमध्ये राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे, साकोलीत काँग्रेसचे नाना पटोले तर भंडारात अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी विजय संपादीत केला. साकोली आणि तुमसरमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाल्याने प्रत्येकांची उत्सूकता शिगेला पोहचली होती. सायंकाळी विजयी उमेदवारांची ढोलताशांच्या गजरात समर्थकांनी मिरवणूक काढून विजयोत्सव साजरा केला.
साकोली मतदारसंघात हेवीवेट लढत होती. भाजपने विद्यमान आमदार राजेश काशीवार यांचे तिकीट कापून पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांना रिंगणात उतरविले. किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या तिकीटावर रिंगणात उडी घेतली. तर काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविली. सुरुवातीपासूनच या मतदारसंघात चुरस निर्माण झाली होती. संपूर्ण विदर्भाचे लक्ष येथील लढतीकडे लागले होते. कोण विजयी होणार याची उत्कंठा होती. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपचे परिणय फुके यांनी आघाडी घेतली. मात्र अकराव्या फेरीपासून नाना पटोले यांच्या मताधिक्यात वाढ होऊ लागली. शेवटच्या सर्व फेऱ्यांमध्ये नाना पटोले यांनी आघाडी घेत विजय संपादीत केला. वंचित बहुजन आघाडीचे सेवक वाघाये यांना तिसºया क्रमांकाची मते मिळाली.
भंडारा मतदार संघात अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी एकहाती विजय संपादीत केला. भंडारा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा अशी त्यांची मागणी होती. मात्र महायुती आणि महाआघाडीने मित्रपक्षाला ही जागा सोडली. त्यामुळे भोंडेकर यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. कायम आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी लढणारे म्हणून भोंडेकरांची प्रतीमा आहे. त्यांच्यामागे तरुणांची मोठी फौज उभी होती. त्यामुळेच पक्षांच्या उमेदवारांना मागे टाकत त्यांनी सुरुवातीपासून आघाडी घेत विजय संपादीत केला.
तुमसर मतदारसंघात राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे विजयी झाले. त्यांनी भाजपचे बंडखोर आमदार चरण वाघमारे यांचा पराभव केला. भाजपने विद्यमान आमदार चरण वाघमारे यांचे तिकीट कापून भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे यांना रिंगणात उतरविले. त्यामुळे वाघमारे यांनी बंडखोरी केली. त्यांनी अगदी निकराची झुंज दिली. मात्र विजय संपादीत करण्यात राष्ट्रवादीला यश आले. भाजपचा उमेदवार येथे तिसºया क्रमांकावर गेला. जिल्ह्यातील निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे तीनही आमदारांच्या भाजपने तिकीट कापल्या आणि तीनही ठिकाणी भाजप पराभूत झाला.
विजयाची उत्सूकता अन् नाना पटोलेंची प्रतीक्षा
अकराव्या फेरीपासून नाना पटोलेंनी आघाडी घेतली. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. नाना पटोले सायंकाळी तहसील कार्यालयात आले, मात्र पोस्टल मतांची मोजणी बाकी होती. बाहेर कार्यकर्ते विजयोत्सवासाठी प्रतीक्षा करीत होते.
कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून नाना पटोले मतमोजणी केंद्राच्या बाहेर आले. कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करून साकोलीतील प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक काढली. काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता.
राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवारात लढत
तुमसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे आणि भाजप बंडखोर अपक्ष चरण वाघमारे यांच्यातच शेवटपर्यंत लढत झाली. पहिल्या फेरीपासून भाजपचे प्रदीप पडोळे तिसºया क्रमांकावर कायम राहिले.
मतमोजणीदरम्यान २८ मतांची अपक्षाने आघाडी घेतल्याने निकालाची धाकधुक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना लागली होती. पुढच्या फेरीत काय होणार, किती लीड मिळाली याचीच प्रत्येकजण चौकशी करीत होते. राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांच्या चेहºयावर कायम तणाव दिसत होता.
अपक्ष उमेदवाराची आघाडी कायम
भंडारा मतदारसंघात अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी महायुतीचे अरविंद भालाधरे आणि महाआघाडीचे जयदीप कवाडे यांचा पराभव केला. त्यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम होती.
मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवारांच्या समर्थकांचा सकाळपासूनच गराडा पडलेला होता. नरेंद्र भोंडेकर यांनी आघाडी घेतल्याचे माहित होताच कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. दुपारपासूनच भंडारा शहरात उमेदवारांचे समर्थक फटाके फोडत असल्याचे चित्र दिसत होते.
या निकालांची ठळक वैशिष्ट्ये काय?
साकोली विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत काँग्रेसचे नाना पटोले यांनी शेवटच्या नऊ फेरीत बाजी मारली.
तुमसरमध्ये राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे यांना २३ व्या फेरीतील गावांनी तारले. तेथून मोठी आघाडी मिळाली. ही गावे त्यांच्या गृह तालुक्यातील आहेत.
भंडारात नरेंद्र भोंडेकर यांनी आंदोलनाच्या माध्यमातून तरुणांना जिंकून घेतले होते. या विजयात त्यांच्या पाठीशी असलेल्या तरुणांचा मोठा वाटा आहे.
तगडा बंदोबस्त
मतमोजणीच्या परिसरात तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रवेशपत्राशिवाय कुणालाही प्रवेश नव्हता. मतमोजणी अगदी शांततेत पार पडली.