Maharashtra Election 2019 ; १२५ मतदान केंद्रांवर होणार वेब कास्टींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:00 AM2019-10-20T06:00:00+5:302019-10-20T06:00:41+5:30
शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, टपालीक मतपत्रिकांतर्गत तीन्ही विधानसभा क्षेत्रातून सहा हजार ८५४ टपाली मतपत्रिका निर्गमीत करण्यात आल्या आहेत. याशिवाय मतदान पथक व इतर कर्मचाऱ्यांतर्गत ८ हजार २६६ टपाली मतपत्रिकाबाबत माहिती उपलब्ध झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सोमवारला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून भंडारा जिल्ह्यातील तीन्ही विधानसभा मतदारसंघांतर्गत १२५ मतदान केंद्रांवर वेब कॉस्टींग करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन मतदान तथा मतमोजणीसाठी पूर्ण तयारी केली असून प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिली.
शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, टपालीक मतपत्रिकांतर्गत तीन्ही विधानसभा क्षेत्रातून सहा हजार ८५४ टपाली मतपत्रिका निर्गमीत करण्यात आल्या आहेत. याशिवाय मतदान पथक व इतर कर्मचाऱ्यांतर्गत ८ हजार २६६ टपाली मतपत्रिकाबाबत माहिती उपलब्ध झाली आहे. तुमसर विधानसभा क्षेत्रांतर्गत एकुण ३५६ मतदान केंद्र असून शहर विभागात २५ तर ग्रामीण क्षेत्रात २२० केंद्र उभारण्यात आले आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्रात ४५६ मतदान केंद्र असून त्यापैकी ५० शहरी भागात तर उर्वरीत २५५ मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रांतर्गत ३९४ मतदान केंद्र असून २५ शहरी भागात तर ७४३ मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत.
जिल्ह्यात ५ हजार २७० दिव्यांग मतदार
तीन्ही विधानसभा क्षेत्रांतर्गत पाच हजार २७० दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आली असून ते आपल्या अधिकाराचा हक्क बजावणार आहेत. तुमसर मतदार संघात १२८१, भंडारा १४६३ तर साकोली विधानसभा क्षेत्रात २५२६ दिव्यांग मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी जिल्ह्यात ९८२ अपंग मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून त्याअंतर्गत ५५४ तीन चाकी (व्हीलचेअर) ची सुविधा असणार आहे.
जिल्हा निवडणूक विभागाने तीन्ही विधानसभा अंतर्गत जिल्ह्यातील १९ मतदान केंद्र संवेदनशील (क्रिटीकल) असल्याचे घोषीत केले आहे .त्यात तुमसर मतदारसंघात तीन, भंडारा नऊ तर साकोली क्षेत्रातील सात मतदान केंद्रांचा समावेश आहे. याशिवाय तुमसर तालुक्यात दोन, भंडारा तालुक्यात दोन तर साकोली मतदारसंघात तीन सखी मतदान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. याशिवाय एवढ्याच संख्येने त्या मतदारसंघामध्ये आदर्श मतदानकेंद्र स्थापित केले जाणार आहे. याची संख्याही सात आहे. वेब कॉस्टींग अंतर्गत तुमसर तालुक्यातील ३५, भंडारा मतदार संघात ५० तर साकोली विधानसभा क्षेत्रातील ४० मतदान केंद्रात वेबकॉस्टींग करण्यात येणार आहे.
निवडणूक विभागाने तीनही विधानसभा क्षेत्रांतर्गत मतदान केंद्राध्यक्ष म्हणून १२०६ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात क्षेत्रीय अधिकाºयांची संख्या १०८ असून त्यात राखीव क्षेत्रीय अधिकारी म्हणून १५ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रथम मतदान अधिकारी म्हणून १२०६ तर इतर मतदान अधिकारी म्हणून २४१२ अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ३७८ अधिकारी राखीव राहणार आहेत. याशिवाय फिरते पथक १२, स्थिर पथक १२ तर अकरा व्हीडीओ निरीक्षण पथक निर्माण करण्यात आले असून सोमवारी मतदानाच्या दिवशी यांची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे.
तुमसर येथील आयटीआय इमारतमध्ये २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. भंडारा येथील पोलीस बहुउद्देशिय सभागृहात तर साकोली येथील तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतमध्ये मतमोजणी होणार आहे. यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक व सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन्ही विधानसभा क्षेत्रांतर्गत एकुण ५४ टेबल राहणार आहेत.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला आहे. यात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात एकुण २३७५ पोलीस कर्मचारी व सुरक्षा रक्षकांची तैनाती राहणार आहे. यात एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, चार उपविभागीय पोलीस अधीक्षक, २३ पोलीस निरीक्षक, ६५ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १२२६ पोलीस हवालदार, ७५६ होमगार्डचे जवान तर बीएसएफची एक तर राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत.
तीनही मतदार संघात मतदान कर्मचाऱ्यांसह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वाहतूक व्यवस्था ही आखली आहे. त्यात राज्य परिवहन महामंडळाच्या १२२ बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यात तुमसर मतदार संघात ३९, भंडारा ३० तर साकोली मतदारसंघात ५३ एसटी बसेस सेवेत दाखल होणार आहेत. याशिवाय भंडारा मतदारसंघात २५ स्कूल बसेस, तुमसर मतदारसंघात १४ शासकीय जीप, भंडारा मतदारसंघात ३५ तर साकोली क्षेत्रात १४ जीप उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय खासगी जीप म्हणून तुमसर क्षेत्रात ६१, भंडारा ५७ तर साकोली क्षेत्रात ५६ जीपची व्यवस्था करून देण्यात आली आहे. याशिवाय साहित्य वहन करण्यासाठी सात ट्रक उपलब्ध राहणार आहेत.