'नगरविकास'च्या आदेशाने नगरपरिषदांमध्ये खळबळ; विकास कामांना खीळ बसण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 12:17 PM2019-12-07T12:17:32+5:302019-12-07T12:18:46+5:30
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना एक आदेश निर्गमित केला. त्या आदेशात विविध विकास कामांना वितरित केलेल्या निधीच्या अनुषंगाने स्थगिती देण्याबाबत म्हटले आहे.
भंडारा : राज्यात सत्तांतर होताच नगरविकास विभागाने नगरपरिषद आणि नगरपंचायती अंतर्गत प्रस्तावित विकास कामांना स्थगिती देण्याचे आदेश दिले. गुरुवारी धडकलेल्या या आदेशाने राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीत खळबळ उडाली आहे. या आदेशाने विकास कामांना खीळ बसेल, अशी भीती नगर परिषदेचे पदाधिकारी व्यक्ती करीत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना एक आदेश निर्गमित केला. त्या आदेशात विविध विकास कामांना वितरित केलेल्या निधीच्या अनुषंगाने स्थगिती देण्याबाबत म्हटले आहे. नगरविकास विभागाच्यावतीने नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रामध्ये विविध विकास कामांसाठी अनुदान देण्यात येते. २०१९-२० मध्ये विविध विकास योजनांसाठी शासनाने निधी वितरित केला होता. मात्र यापैकी अनेक कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला नाही. आता या सर्व कामांच्या कार्यारंभ आदेशाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
एवढेच नाही तर ज्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले, अशा कामांची शासन निर्णय निहाय यादी नगर विकास विभागाला तात्काळ पाठविण्याचेही म्हटले आहे. भंडारा नगरपरिषदेसह जिल्ह्यातील बहुतांश नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर भाजपची सत्ता आहे. युतीच्या काळात अनके विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती. परंतु अनेक कामांचे कार्यारंभ आदेश काढणे शक्य झाले नाही. आता राज्यात सत्तांतर झाल्यांनतर प्रस्तावित विकास कामांना स्थगिती देण्याचे आदेश धडकले. त्यामुळे भंडारासह जिल्यातील नगरपरिषदांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शहरात रस्ते, नाल्या,बगीचे, समाजभवन यासह विविध विकास कामे प्रस्तावित आहे. परंतु आता या कामांना स्थगिती दिल्याने शहराच्या विकासाला खीळ बसेल,असे नगरपरिषद वर्तुळात बोलले जात आहे.शहराचा विकास थांबवण्याची भीती काही नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.