महाराष्ट्र ही संत, शूर वीरांची भूमी आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:23 AM2021-02-22T04:23:38+5:302021-02-22T04:23:38+5:30
प्राणहंस मेश्राम : महाप्रज्ञा बुद्धविहारात शिवाजी महाराज जयंती लाखनी : शिवाजीराजे हे लहानपणापासूनच आई जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली होते. त्यांनी परकियांची ...
प्राणहंस मेश्राम : महाप्रज्ञा बुद्धविहारात शिवाजी महाराज जयंती
लाखनी : शिवाजीराजे हे लहानपणापासूनच आई जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली होते. त्यांनी परकियांची गुलामगिरी पाहिली. ती असह्य झाल्याने बाळ शिवबाला स्वराज्यनिर्मितीसाठी सज्ज केले. जिजाऊंच्या संस्कारांत वाढलेल्या शिवबाने अठरापगड जातींतील लोकांना संघटित करून परकीय शत्रूला धूळ चारली व स्वराज्याची पताका रोवली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजे शिवाजी यांनी ही अशक्य कामगिरी तडीस नेली. महाराष्ट्र ही संतांची व शूरवीरांची भूमी आहे, असे प्रतिपादन प्राणहंस मेश्राम यांनी केले.
लाखनी येथील स्थानिक महाप्रज्ञा बुद्धविहाराच्या सभागृहात महाराष्ट्र कास्ट्राईब शिक्षक संघटना, शाखा लाखनीच्या वतीने राजे शिवछत्रपती यांची जयंती साजरी करण्यात आली. महाप्रज्ञा बुद्धविहाराचे सचिव प्राणहंस मेश्राम हे शिवजयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष होते; तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे, सतीश भोवते, मनोज बारसागडे व सुनील करवाडे हे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे म्हणाले, शिवाजी महाराजांसारखा लढवय्या व नैतिक गुणसंपन्न राजा महाराष्ट्राच्या भूमीत जन्मास आला, ही राज्यासाठीच नाही तर भारत देशासाठीसुद्धा भूषणावह बाब आहे. शत्रूंच्या लेकीबाळींना आई-बहिणीसमान लेखून त्यांना सन्मान देणारा राजा या भारतभूमीवर मला आजतागायत सापडलेला नाही. रयतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन, त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करून स्वराज्याच्या भूमीवर स्वर्ग निर्माण करणारा तो एकमेव रयतेचा राजा आहे.
यावेळी महाराष्ट्र कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सतीश भोवते आपल्या उद्बोधनात म्हणाले की, राजे शिवाजी हे एक प्रभावी व उच्च प्रतीचे रणनीतिज्ञ होते. त्यांनी आपल्या रणकौशल्याने अनेक कठीण प्रसंगांतील लढाया जिंकल्या. त्यांच्या प्रत्येक मावळ्यात स्वराज्यप्राप्तीची ओढ होती. स्वराज्यरक्षणासाठी त्यांनी अभेद्य आरमाराची निर्मिती केली होत, हे त्यांच्या संरक्षणकौशल्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. सुनील करवाडे यांनी संचालन केले, तर मनोज बारसागडे यांनी आभार मानले.