सिहोरा परिसरातील महाशिवरात्री यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:45 AM2021-02-25T04:45:19+5:302021-02-25T04:45:19+5:30
राज्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव वाढत असल्याने, अनेक जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी, काही जिल्ह्यांत आठवडाभराचा लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. ...
राज्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव वाढत असल्याने, अनेक जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी, काही जिल्ह्यांत आठवडाभराचा लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले नसल्याने, दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे सांगितले जात आहेत. जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी अनेक निर्देश व उपाययोजना सांगत आहेत, परंतु नागरिक डोळेझाक करीत आहेत. यामुळे ग्रामीण भागातही कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यातील महाशिवरात्री यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. सिहोरा परिसरात आयोजित होणाऱ्या गायखुरी देवस्थान, धुटेरा देवस्थानच्या यात्रा रद्द करण्यात आलेल्या आहेत. वैनगंगा, बावणथडी नद्यांचे संगम असणाऱ्या बपेरा गावांच्या शेजारी महाशिवरात्रीनिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या संगम परिसरात गायखुरी देवस्थान आहे. नदीच्या संगमामध्ये दगडावर गाईच्या खुरी कोरल्या असल्याने गायखुरी देवस्थान अशी आस्था आहे. या देवस्थानात गोंदिया, भंडारा आणि बालाघाट जिल्ह्यातील भाविक महाशिवरात्री यात्रेत दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. आठवडाभरापासून भाविक हजेरी लावत असल्याने मंडळ सेवा आणि सुविधा उपलब्ध करीत आहेत. गावातील रस्ते व स्वच्छता करण्यात येत आहेत, परंतु यंदा मात्र या यात्रेवर कोरोना संसर्ग प्रादुर्भावाने विरजण पडले आहे. दरम्यान, भाविकांची या देवस्थानात आस्था असल्याने, महाशिवरात्रीनिमित्त दर्शनाकरिता येण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करण्यासाठी मंडळ समित्या बैठका घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. विदर्भात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याच्या कारणावरून मध्य प्रदेशातील सीमेवर अलर्ट घोषित करण्यात आले आहे. मोवाड सीमेवर तपासणी व निगराणी वाढविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्ह्याचे सीमा सील करा
विदर्भातील नागपूर शहरात कोरोना संसर्गबाधित रुग्ण संख्या वाढत असल्याचे वृत्त नागरिकांचे कानावर येत आहेत. ग्रामीण भागात नागपूरहून येणाऱ्या इसमाकडे संशयित नजरेने पाहिले जात आहेत. जिल्ह्यात असे रुग्ण नसले, तरी उपाययोजना म्हणून सीमा सील करण्याची ओरड सुरू झाली आहे. रुग्ण वाढण्याच्या आधीच उपाययोजना करण्यात येत नसल्याने, नंतर गाव खेड्यात जलद गतीने कोरोनाचा संसर्ग पोहोचत आहे. जिल्ह्याचे सीमेवर तपासणी वाढविण्याची मागणी होत आहे.
कार्यक्रमात बेधडक नागरिकांची गर्दी
सिहोरा परिसरातील ग्रामीण भागात अनेक कार्यक्रमाचे आयोजन सुरूच आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडत आहे. कार्यक्रमात हजेरी लावल्याचा आनंद आणि कोरोना संसर्गची भीती असे चित्र प्रत्येकाच्या मनात आहे. शासनाच्या गाइडलाइनला धाब्यावर बसविण्यात येत आहे. कुणी नियम व निर्देश पाळत नाहीत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क अनिवार्य करण्यात आले आहे, परंतु कुणी ऐकायला तयार नाहीत. यामुळे भीतिदायक चित्र असल्याचे दिसून येत आहे.