महात्मा फुले जन आरोग्य योजना : बुलडाणा जिल्ह्यात शस्त्रक्रिया, उपचारावर ११४ कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 02:52 PM2018-11-28T14:52:51+5:302018-11-28T14:53:32+5:30
बुलडाणा : महत्मा फुले जनआरोग्य योजनेवर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात ११४ कोटी ५ लाख ६३ हजार ९३७ रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : महत्मा फुले जनआरोग्य योजनेवर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात ११४ कोटी ५ लाख ६३ हजार ९३७ रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लाखो गोरगरीब रुग्णांच्या दिमतीला असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची सुविधा जिल्ह्यातील दहा रुग्णालयातून दिल्या जात आहे.
महागाईच्या काळात आजारही वाढले आहेत. त्यात सर्वसामान्यांना आजारांवर उपचार घेण्यासाठी मोठ्या हॉस्पीटलमध्ये जाणे परवडणारे राहिले नाही. सामान्य नागरिकांना एखादा गंभीर आजार झाला तर पैशाअभावी त्याला आपला जीव गमवावा लागत असे; त्यासाठी सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचार घेत यावे, यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली. या योजनेची मुदत १ आॅक्टोबर २०१६ रोजी संपल्यानंतर राज्य शासनाने या जुन्या योजनेच्या धर्तीवर नविन उपचारांचा समावेश असलेली महात्मा फुले जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त सुरू केली आहे. २८ नोव्हेंबर रोजी असलेल्या महात्मा फुले पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर या योजनेची माहिती घेतली असता ही बाब समोर आली.
या योजनेमुळे शासन उपचाराची रक्कम देत असल्याने यामुळे अनेकांचे जीव वाचत आहेत. या योजनेची माहिती मिळावी यासाठी प्रत्येक शासकीय रुग्णालयात समन्वयक नेमलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना लागू असून बुलडाणा जिल्ह्यातील १० हॉस्पिटलची यामध्ये निवड करण्यात आली आहे. या योजनेतून शस्त्रक्रिया व उपचारांसाठी ११४ कोटी ५ लाख ६३ हजार ९३७ रुपये खर्च करण्यात आलेला आहे. गेल्या पाच वर्षामध्ये ४५ हजार २५९ पेक्षा जास्त रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले आहेत. या योजने अंतर्गत दीड लाखापर्यत इतर आजारासाठी तर किडनी ट्रान्सफर साठी २.५० लाख रुपयांची मदत शासनामार्फत रुग्णाला केली जाते.
गंभीर आजारामध्ये लाभ
गंभीर आजारामध्ये हृदयविकार, डायलिसिस, कॅन्सर, स्टोन, फ्रॅक्चर यासारखे आजार असणाºया रुग्णांना याचा लाभ होत आहे. जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद या भागात स्टोनची समस्या असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात असून अनेक रुग्णांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.
१३ हजार ७११ शेतकऱ्यांचा उपचार
या आरोग्य योजनेतून एकूण ४५ हजार २५९ रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये १३ हजार ७११ शेतकºयांचा समावेश असून त्यांच्यावर ३६ कोटी ४३ लाख ६९ हजार ५ रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर इतर रुग्णांची संख्या ३१ हजार ५४८ असून त्यांच्यावर ७७ कोटी ६१ लाख ९४ हजार ९३२ रुपये खर्च करण्यात आला आहे.