महाविकास आघाडी सरकारच्या शिवभोजन थाळीने हजारो लोकांचे पोट भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:23 AM2021-06-30T04:23:02+5:302021-06-30T04:23:02+5:30

भंडारा : गोरगरिबांना वेळेत अन्न मिळावे, त्यांची उपासमार थांबावी यासाठी महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळीची योजना सुरू केली. ...

The Mahavikas Aghadi government's Shiv Bhojan plate filled the stomachs of thousands of people | महाविकास आघाडी सरकारच्या शिवभोजन थाळीने हजारो लोकांचे पोट भरले

महाविकास आघाडी सरकारच्या शिवभोजन थाळीने हजारो लोकांचे पोट भरले

googlenewsNext

भंडारा : गोरगरिबांना वेळेत अन्न मिळावे, त्यांची उपासमार थांबावी यासाठी महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळीची योजना सुरू केली. या शिवभोजन थाळीचा अनेक गरजूंना आधार होत असून, कामानिमित्ताने बाहेरगावी आलेल्यांनाही पोटभर जेवण मिळत असल्याने ही योजना सर्वसामान्यांसाठी आधार ठरली आहे. जिल्ह्यात सुरुवातीला १३ शिवभोजन केंद्रे होती. मात्र, आता नागरिकांचा वाढत असलेला प्रतिसाद पाहून राज्य शासनाने या केंद्रांची संख्या वाढविल्याने आता जिल्ह्यात एकूण ३८ केंद्रांमार्फत मोफत शिवभोजन दिले जात आहे. १४ एप्रिल ते १५ जुलैपर्यंत मोफत शिवभोजन थाळीचा लाभ मिळणार आहे. २६ जानेवारी २०२० रोजी शिवभोजनाचा शुभारंभ करण्यात आला होता. शिवभोजन केंद्राचा संचारबंदीतही अनेकांना आधार ठरल्याने या योजनेबद्दल समाधान व्यक्त होत आहे. मात्र, असे असले तरीही राज्यस्तरावरून अनुदानाचा विलंब झाल्यास केंद्र चालकांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागते. मात्र, जिल्हास्तरावरून अनुदान प्राप्त होताच केंद्र चालकांना वितरित करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येतो. जिल्ह्यात ३८ केंद्रांवरून दररोज पाच हजार थाळ्यांचे वितरण केले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात हजारो लाभार्थींनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे.

बॉक्स

जिल्हा परिषद कँटीनच्या शिवभोजनाची चवच न्यारी...

भंडारा शहरातील जिल्हा परिषद कँटीनमधील शिवभोजन थाळीची चवच न्यारी असल्याचे येथील आलेल्या ग्राहकांनी सांगितले. याशिवाय येथे कोरोना नियमांचे पालन व स्वच्छता राहत असल्याने माविंम संचलित केंद्रांतर्गत कार्यरत शिवभोजन केंद्राकडे अनेकांचा ओढा आहे. केंद्र चालकांना सरकारतर्फे अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. १४ एप्रिलपासून राज्य शासनाने मोफत शिवभोजन थाळी देण्यास सुरुवात केली आहे. १५ जुलैपर्यंत मोफत थाळी मिळणार आहे.

बॉक्स

ग्रामीणला ३५ तर शहरात ४५ रुपये अनुदान

राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीत दोन चपात्या, एक भाजी, भात, आमटी असे पोटभर जेवण दिले जाते. सर्वसामान्यांना जरी मोफत अथवा पाच ते दहा रुपये मोजावे लागत असले तरी शासन केंद्र चालकांना ग्रामीण भागात ३५ रुपये तर शहरी भागात ४५ रुपयांचे अनुदान देत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना उत्तम प्रतीचे जेवण मिळत असल्याने ही योजना सामान्यांना दिलासा देणारी ठरली आहे. ग्रामीण भागातून विविध कामांसाठी लवकर आलेल्या नागरिकांना शिवभोजन थाळीमुळे कमी पैशात चांगले जेवण मिळत आहे.

कोट

शिवभोजन केंद्रांचा इष्टांक शासनाने वाढविला असून, जिल्ह्यात सध्या ३८ शिवभोजन केंद्रे कार्यरत असून, त्या माध्यमातून अनेकांना लाभ दिला जात आहे. केंद्राचे अनुदान हे ऑनलाइन दिले जाते. राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त होताच केंद्रांना तत्काळ वितरित करण्यात येते.

अनिल बन्सोड, जिल्हा पुरवठा अधिकारी,भंडारा

केंद्र चालक काय म्हणतात

कोट

शिवभोजन थाळीसाठी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आम्ही कोरोना नियमांच्या पालनात एका वेळी दहा जणांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. जिल्हा परिषद प्रांगणात आमचे केंद्र असल्याने येथे अनेक कामांसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. सर्व शासन नियमांनुसार पूर्ण व्यवस्था आहे.

रंजना खोब्रागडे, व्यवस्थापक, नवप्रभा साधन केंद्र, भंडारा

कोट

दुसऱ्यांदा लॉकडाऊन सुरू झाले होते. त्यावेळी केंद्रात अधिक ग्राहक येत होते. कधी कधी अनुदान मिळविण्यास थोडा उशीर लागला तरी आम्ही सर्वसामान्यांची गैरसोय होऊ देत नाही. आता अनुदान मिळण्यात कोणतीही अडचण येत नाही. जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून अनुदान दिले जाते.

केंद्र चालक, भंडारा

Web Title: The Mahavikas Aghadi government's Shiv Bhojan plate filled the stomachs of thousands of people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.