रावणवाडी जलाशयाचे मुख्य गेट तुटलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:54 PM2018-04-16T22:54:26+5:302018-04-16T22:54:47+5:30
सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हे शासनाचे धोरण असून मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हे शासनाचे धोरण असून मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. परंतु रावणवाडी जलाशयाचे मुख्य गेट तुटलेले असून या जलाशयातून पाण्याचा दररोज अपव्यय सुरू आहे. मात्र याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष अद्याप गेलेले नाही.
भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी हे मुख्य पर्यटनस्थळ असून दाट वनराईने नटलेले आहे. दोन डोंगराच्या मधोमध विस्तीर्ण जलाशय असून दररोज हजारो पर्यटक रावणवाडीला भेट देत असतात. विस्तीर्ण पसरलेल्या जलाशयाला एक मुख्य गेट असून या गेटमधून रावणवाडी, वाकेश्वर, बोरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात कालव्याद्वारे पाणी दिले जाते. व याच पाण्यावर रावणवाडी परिसर सुजलाम-सुफलाम झालेला आहे. परंतु मागील वर्षापासून जलाशयाचे मुख्य गेट तुटलेले असून या जलाशयातून पाण्याचा अपव्यय होत आहे. याबाबत रावणवाडी, वाकेश्वर, बोरगाव येथील शेतकऱ्यांनी भंडारा पाटबंधारे विभागाला निवेदन दिले परंतु या विभागाने कोणतीही उपाययोजना केली नाही. सद्यस्थितीत जलसाठा कमी असल्यामुळे परिसरातील नागरिकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. या मुख्य गेटची दुरूस्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.