जातीय सलोखा कायम राखा

By Admin | Published: September 19, 2015 12:45 AM2015-09-19T00:45:07+5:302015-09-19T00:45:07+5:30

गणेशाचे आगमन पावसाने झाले असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

Maintain communal harmony | जातीय सलोखा कायम राखा

जातीय सलोखा कायम राखा

googlenewsNext

जातीय सलोखा समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन
भंडारा : गणेशाचे आगमन पावसाने झाले असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. अशा या वातावरणात जनतेने सर्व धर्माप्रती मानवतावादी दृष्टिकोन ठेवून उत्सव आनंद व उल्हासात साजरा करण्यासाठी शांतता व जातीय सलोखा कायम राखावा, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.
जातीय सलोखा समितीची बैठक पोलीस मिटींग सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, पोलीस उपअधीक्षक पी.पी. धरमशी, पुरवठा अधिकारी मिलींद बनसोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आडे, तहसिलदार सुशांत बनसोडे, भंडारा नगर परिषद मुख्याधिकारी रविद्र देवतळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जनता व प्रशासन यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेने सर्व धर्माप्रती मानवता दृष्टीकोन ठेवला पाहिजे. माझा धर्म मोठा अशी भावना बाळगायला नको, सहिष्णूता राखली पाहिजे. आपल्या देशात युवकांचे प्रमाण ५० टक्के असतांना अशा घटना होत असतील तर त्यासाठी सदविवेक बुध्दीची आवश्यकता आहे. या देशात गरीबी, कुपोषण असे अनेक प्रश्न असतांना जाती धर्माच्या नावावर वाद घालणे योग्य नाही. या सामाजिक समस्येवर मात करण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकत आहे. गणेशोत्सव मंडळानी सामाजिक समस्या, मुलींच्या शिक्षणावर आधारित दृष्ये गणेशोत्सवाचे ठिकाणी सादर करावीत. यामुळे जनजागृती होऊन देशाच्या विकासात भर पडेल. गणेशाची विटंबना होणार नाही. याची दक्षता गणेश मंडळानी घ्यावी. मंडळाचे काम सचोटीपूर्ण असावे. दारु पिऊन नागरिकांना तसेच महिलांना त्रास होईल असे कृत्य करु नये व इतरांना त्याठिकाणी दारु पिऊन येण्यास मज्जाव करावा. अभद्र व्यवहार करु नये. गणेशोत्सवात अवैध विद्युत पुरवठा घेऊ नये. या कारणांमुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशाची घटना महत्वाची असून कायद्यापुढे सर्व धर्म समान आहेत याचेही नागरिकांनी भान ठेवावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यात सकारात्मक विचारधारा दिसून येत आहे. त्यानुसार कोणाचेही अहित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विसर्जनाच्या दिवशी वेळेचे, सुरक्षिततेचे तसेच पोलीस विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. गणेशोत्सवानंतर शहरातील अतिक्रमणाची कार्यवाही त्वरीत करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
गणेशोत्सव व बकरी ईद या सणांदरम्यान काही असामाजिक तत्व प्रशासनाच्या चुका शोधून त्याचे भांडवल करतात. चुकीच्या सामाजिक व धार्मिक बाबींविरुध्द जनतेने उभे राहून चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा. या गणेशोत्सवा दरम्यान ५० सार्वजनिक गणेश मंडळ असून जिल्हयात एक गाव एक गणपती या नुसार २५७ गणेश मंडळाची नोंद घेण्यात आली आहे. तसेच जिल्हयात अंदाजे २२०८ खाजगी गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली असल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितले. संयम व शांततेने सर्व सण साजरे करावे व जिल्हयातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झलके यांनी केले.
अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी प्रास्ताविकातून जनता व प्रशासन यांच्यात जातीय सलोखा राखण्याविषयी समितीची भूमिका विषद केली. संचालन पोलीस निरीक्षक कोलवटकर यांनी केले तर परिविक्षाधीन पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. बैठकीला जिल्ह्यातील शांतता समितीचे सदस्य, उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा, पवनी, साकोली तसेच पोलीस अधिकारी, इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Maintain communal harmony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.