विद्युत रोहित्रांची देखभाल दुरुस्ती वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:33 AM2020-01-03T00:33:58+5:302020-01-03T00:37:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : विद्युत गळती व भारनियमनाच्या विळख्यात सापडलेल्या वीज वितरण कंपनीने विद्युत रोहित्रांची देखभाल दुरुस्तीही वाºयावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विद्युत गळती व भारनियमनाच्या विळख्यात सापडलेल्या वीज वितरण कंपनीने विद्युत रोहित्रांची देखभाल दुरुस्तीही वाºयावर सोडली की काय? असे चित्र आहे. जिल्ह्यातील बहुतांश विद्युत रोहित्रांची अवस्था बिकट असून घटना घडल्यावर सुधारणा होणार काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
एकट्या भंडारा शहरातील विद्युत रोहित्रांची अवस्था बघीतल्यास याची प्रचिती येईल. दुसरीकडे ग्रामीण भागातील या विद्युत डीपींची अवस्था काय असेल हे न बोललेलेच बरे. दोन वर्षांपुर्वी तत्कालीन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भंडारा जिल्ह्याच्या दौºयावर असताना त्यांनी जिल्ह्यातील सर्वच विद्युत रोहित्रांच्या अवस्थेबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तंबी देत ठरावीक कार्यकाळही ठरवून दिला होता. आदेशाची अंमलबजावणी काही दिवसच झाली. मात्र त्यानंतर स्थिती जैसे थे अशी झाली. शहरासह ग्रामीण भागातील विद्युत रोहित्राच्या सभोवताल झाडेझुडपी व केरकचरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या रोहित्राच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील वीज रोहित्रांची संख्या बघता त्या मानाने त्यांची देखभाल व दुरुस्ती होत नाही. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.
तक्रार केल्यावर होते दुरुस्ती
सार्वजनिक जागेवर असलेल्या किंवा रस्त्याच्या कडेवरील विद्युत रोहित्रांवर मोठ्या प्रमाणात झाडेझुडपी वाढल्याचे दिसून येते. एकट्या भंडारा शहरातच ४५० पेक्षा जास्त विद्युत रोहित्रांची संख्या असून जिल्ह्याभरात सात हजारपेक्षा अधिक रोहित्रांची संख्या आहे. रहिवासी परिसरात असलेल्या डीपींची अवस्थाही योग्य नाही. अशावेळी एखाद्या जागरुक नागरिकाने याबाबत वीज वितरण कंपनीला माहिती दिल्यावरच त्या रोहित्राची देखभाल व दुरुस्ती केली जाते. दुसरीकडे बहुतांश रोहित्र हे उघड्यास्थितीतच दिसून येतात. अशावेळी एखादी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.