जिल्ह्यात २०० हेक्टरवर मका पिकाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:34 AM2021-03-19T04:34:54+5:302021-03-19T04:34:54+5:30

भंडारा : शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करावा व त्यांचे अर्थकारण उंचावले जावे यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भंडारा ...

Maize cultivation on 200 hectares in the district | जिल्ह्यात २०० हेक्टरवर मका पिकाची लागवड

जिल्ह्यात २०० हेक्टरवर मका पिकाची लागवड

Next

भंडारा : शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करावा व त्यांचे अर्थकारण उंचावले जावे यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भंडारा अंतर्गत जिल्हाभरात मका पिकाचे २०० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात मका पिकासाठी मुबलक पाणी व जमीन अनुकुल असल्याने शेतकऱ्यांना हे पीक फायदेशिर ठरत आहे.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा भंडारा अंतर्गत विविध ठिकाणी मका पिकाचे प्रात्यक्षिके राबविण्यात आले आहेत. या प्रात्यक्षिकांची तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी पाहणी केली. भंडारा तालुक्यातील खरबी (नाका) येथील प्रगतशील महिला शेतकरी वंदना वैद्य यांच्या शेतात असलेल्या मका पिकाची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भंडारा मंडळ कृषी अधिकारी दीपक आहेर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, कृषी सहाय्यक रेणुका दराडे, चिखलीचे कृषी मित्र शाम आकरे, तानाजी गायधने, शेतकरी सुरेश गिऱ्हेपुंजे यांच्यासह परिसरातील अन्य शेतकरी उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी कोटांगले यांनी शेतकऱ्यांना मका हे रबी पीक असून हरभरा तसेच गहू पिकाला एक उत्तम पर्यायी पीक असून दिवसेंदिवस हवामानातील होणारा बदल आणि कीड रोग व्यवस्थापनासाठी वाढलेला खर्च यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता मका हे पीक कमी कालावधीत व चांगले उत्पादन मिळवून देणारे पीक असल्याचे सांगितले. यासाठी शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पद्धतीत बदल करुन मका पिकाचे लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचे त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. मका पिकाला चांगला भाव मिळत असुन याची मागणीही वाढत आहे. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन सतीश वैरागडे यांनी भंडारा तालुक्यातील मका लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावरील विविध अनुभव कथन करताना मका पीक शेतकऱ्यांना कसे फायदेशीर ठरत आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मका पिकाला औषध फवारणीचा तसेच खत व्यवस्थापनाचा कमी खर्च येत असल्याने तसेच जमीन भुसभुशीत राहुन धान पिकासाठी फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले. पारंपारिक पद्धतीने वर्षानुवर्ष घेतल्या जाणाऱ्या धानपिकाऐवजी मका पीक शेतकऱ्यांनी घेण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी दीपक आहेर यांनी शेतीला वाढत्या उत्पादन खर्च कमी करण्यासाठी असे नाविण्यपुर्ण पीक म्हणून मका लागवड हे दुग्ध व्यवसायासाठीही फायदेशीर असल्याचे सांगितले. कृषी सहाय्यक रेणुका दराडे यांनी वंदना वैद्य या महिला शेतकऱ्याने घेतलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेतून बागायती शेती कशी फुलविली व त्यासाठी कृषी विभागाची कशी मदत घेतली याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मल्चींग व ठिबक सिंचन लावण्याचे आवाहन केले.

बाजार समितीत क्विंटलला १८६० रुपयांचा दर

शेतकऱ्यांना मका पिकाचे एकरी उत्पादन २५ ते ३० क्विंटल सरासरी होत आहे. तर मका पिकाला बाजार समितीत प्रती क्विंटलला १८६० रुपयांचा दर असून साधारणपणे विचार केल्यास शेतकऱ्याला एकरी ५० हजार रुपयांचे उत्पादन होणार आहे. तर यामधून पिकाचा खर्च वजा करता साधारणपणे ४० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळत आहे. त्यामुळे पारंपारिक धान पिकापेक्षा शेतकऱ्यांना मका पिकातून चांगले उत्पादन शक्य आहे. याशिवाय शेतातील जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होत असून येणाऱ्या खरीप हंगामातून धान पिकालाही फायदेशीर ठरत असल्याने हे पीक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

भंडारा तालुक्यात सर्वाधिक लागवड

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल करण्यासाठी मका पिकाचा लागवडीचे प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पीक पद्धतीत बदल करण्यासाठी भंडारा तालुक्यात सर्वाधिक मका लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे अर्थकारणही बदलण्यास मका पीक फायदेशीर ठरणार असल्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी सांगितले.

Web Title: Maize cultivation on 200 hectares in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.