‘मकरसंक्रांत’ परिवर्तनाची नांदी
By Admin | Published: January 22, 2017 12:25 AM2017-01-22T00:25:24+5:302017-01-22T00:25:24+5:30
जिथे महिला तिथे हेवे-दावे, चुगली करण्याचा प्रकार असतोच अशी परिभाषा महिलांसंबंधात वापरली जाते.
सासू-सुनेचा सत्कार : गणेशपुरातील सहकार वसाहतीचा उपक्रम
प्रशांत देसाई भंडारा
जिथे महिला तिथे हेवे-दावे, चुगली करण्याचा प्रकार असतोच अशी परिभाषा महिलांसंबंधात वापरली जाते. अनेकदा अनेकांची मने तुटून वादविवाद वाढतात. मात्र, गणेशपूर येथील सहकार वसाहतीतील महिलांनी एकत्र येऊन सामूहिक ‘मकरसंक्रांत’ कार्यक्रमातून आदर्श परिवर्तनाचा ठेवा समाजासमोर ठेवला आहे.
मकरसंक्रांत हा महिलांच्या सामुहिक तथा वयक्तीक संबंध वृद्धींगत करण्याचा मोठा सण. या दिवसात कधी नव्हे तेवढे महिलांचे जत्थे ‘वाण’ घेण्यासाठी घराबाहेर पडतात. सुमारे १५ दिवस सायंकाळच्या सुमारास महिलांसह छोट्या मुलीही वॉर्डावॉर्डात फिरताना दिसतात. अशा या महत्वाच्या संक्रांतीच्या सणातून गणेशपूर येथील सहकार वसाहतीतील महिलांनी एकोप्याचे दर्शन घडवून येथील सुमारे ३५ कुटुंबांमध्ये आत्मीयता व सहकार्याच्या भावनेची गुंफन घातली आहे. महिलांनी राबविलेल्या हळदीकुंकूच्या सामूहिक कार्यक्रमाची ही चळवळ खरोखरच सर्वांसाठी आदर्श ठरली आहे.
गणेशपूर हे भंडारा शहरालगतची ग्रामपंचायत. येथील राजेंद्र वॉर्डात सहकार वसाहत आहे. येथील २७ कुटुंब व त्यांच्याकडील भाडेकरी असे सुमारे ३५ कुटुंबाती महिला गुण्यागोविंद्याने ‘एकच घर’ असल्यासारख्या वागतात. त्यांच्या या एकोप्यातून मागील चार वर्षापूर्वी त्यांनी गणपती मंदिरात एकत्र येवून मकरसंक्रांतीचा सामूहिक कार्यक्रम साजरा करण्याचा संकल्प केला. या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण प्रत्येक महिलेने त्यात सहभाग घेतला.
महिलांनी घेतलेल्या निर्णयाला कुटुंब प्रमुखांनीही प्रोत्साहन देत आर्थिक पाठबळ दिले. कार्यक्रमाच्या आखणीसाठी महिलांनी वेगवेगळी कमिटी बनवून सर्वांना कामाची जबाबदारी सोपविली. महिलांच्या या नवोपक्रमाची दखल अन्य वॉर्डातील महिलांनी घेवून समाजात वाढत चाललेल्या ‘भेदभाव भिंत’ तोडण्यासाठी आदर्श ठरू शकते.
यातील प्रत्येक महिला सर्वांच्या घरी न जाता मंदिर परिसरात होणाऱ्या सामूहिक कार्यक्रमाला उपस्थित होऊन एकमेकींना वाण देतात. ‘एक वसाहत एक वाण’ हा प्रकार समाजासाठी नवीन असला तरी, त्यातून या महिलांनी दिलेला एकोप्याचा संदेश महत्त्वाचा आहे. हा आदर्श खरोखरचं समाजासाठी नवा पायंडा घालणारा आहे.
सासू-सुनेचा सत्कार व बाळांची लूट
वसाहतीतील महिलांनी प्रत्येक घरातील सासू व सुनेचा सत्कार करण्याचा नवोपक्रम राबविला आहे. सासुंना गृहोपयोगी साहित्य तर सुनेला प्रवासी महिला हॅण्ड बॅग भेट दिली. या कार्यक्रमात ज्यांच्या घरी छोटे बाळ आहेत अशांची सामुहिक ‘लूट’ करण्यात येते. यावर्षी चार महिने ते पाच वर्षाच्या बाळांची लूट करण्यात आली.
मनोरंजन व भोजनाची मेजवानी
या उपक्रमात सर्वांचे मनोरंजन व्हावे व प्रत्येकाला रंगमंच मिळावा यासाठी मनोरंजनात्मक खेळ, हळदीकुंकू व उखाणे कार्यक्रम घेण्यात आले. स्वरूची भोजनाच्या मेजवाणीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यात बालगोपाल, महिला व वृद्धांनी सहभाग घेतला.