पशूपालनातून प्रगती साधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 10:09 PM2018-12-04T22:09:52+5:302018-12-04T22:10:23+5:30
पशूपालन हे शाश्वत उत्पन्नाचे साधन असून हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने केल्यास त्यातून स्वावलंबी होता येते. यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला पूरक म्हणून पशूपालनाचा व्यवसाय करावा, असे आवाहन आमदार डॉ.परिणय फुके यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पशूपालन हे शाश्वत उत्पन्नाचे साधन असून हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने केल्यास त्यातून स्वावलंबी होता येते. यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला पूरक म्हणून पशूपालनाचा व्यवसाय करावा, असे आवाहन आमदार डॉ.परिणय फुके यांनी केले.
भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तालुक्यातील खमारी येथे आयोजित पशू पक्षी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपाते होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सुनील मेंढे, जिल्हा परिषद सदस्य नीळकंठ कायते, उपसभापती वर्षा साकुरे, पंचायत समिती सदस्य नितू सेलोकर, सुजाता फेंडर, प्रमिला लांजेवार,प्रभू फेंडर, सरपंच कृष्णा शेंडे, उपसरपंच राजूभाऊ मोटघरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नितीन फुके, प्रादेशिक सहआयुक्त किशोर कुंभारे उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार फुके म्हणाले, भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील एक हजार शेतकºयांना संकरीत गायी वाटप योजना व दहा शेळ्या व एक बोकड वाटपाची योजना तयार करण्यात आली आहे. मानव विकास कार्यक्रमामध्ये एक कोटी ८६ लक्ष बचत गटातील महिलांना शेळी गट व कुक्कूटगट वाटप करण्यात आले आहे. पूर्वी पशूसंवर्धन हा विभाग दुर्लक्षीत होता. परंतु पशुपालन हा व्यवसाय शाश्वत उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांसोबतच महिला व सुशिक्षित महिलांनीही पशुपालनाकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सेवानिवृत्त सुरेश ईश्वरकर यांचा सत्कार आमदार फुके यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वयोवृद्ध गुराख्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नितीन फुके यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. भंडारा जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने केलेल्या कामाची माहिती दिली. तसेच गतवर्षात दररोज ५० हजार लिटर दूध उत्पानात वाढ झाल्याचे सांगितले. आमदार डॉ.परिणय फुके यांनी पशुसंवर्धन विभागाला शेतकऱ्यांच्या विविध योजनातून जवळपास तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पशुपालक व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. यानिमित्ताने आयोजित प्रदर्शनीमध्ये देशी विदेशी संकरीत गायी, म्हशी, कोंबड्यांचे विविध प्रकार ठेवण्यात आले होते. खिल्लारी व देशी वानाचे बैल या प्रदर्शनाचे आकर्षण ठरले होते. कृषी विभागाच्या वतीने शेती उपयोगी नवीन तंत्रज्ञानाची माहितीही देण्यात आली. प्रदर्शनाचा लाभ शेतकºयांनी घेतला. कार्यक्रमाचे आयोजन पशुधन विकास अधिकारी डॉ.सरिता चोले यांनी केले होते. यशस्वितेसाठी डॉ.खोब्रागडे, डॉ.टेंभुर्णे, डॉ.हटवार, डॉ.वैद्य, डॉ.मानकर यांनी परिश्रम घेतले.