शिक्षण सेवक भरती तात्काळ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 09:32 PM2018-09-08T21:32:02+5:302018-09-08T21:32:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शिक्षण सेवक भरती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनामध्ये, राज्यातील सर्व स्थानिक संस्थासह खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशत: अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदावर भरती करतांना सर्व पदासाठी निवडीची समान संधी मिळावी, शिक्षण सेवक पदांसाठी उच्च गुणवत्ता धारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवक भरती 'अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी' मधील गुणांच्या आधारे करावी, तसेच खाजगी अनुदानित शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेत समायोजन करू नये आदी मागण्यांचा समावेश आहे. अर्धे सत्र संपण्याच्या मार्गावर असताना कित्येक शाळांना शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे भावी पिढ्यांचे नुकसान होत असून या गंभीर प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासन व शासन यांनी यावर कृतिशील कालबद्ध कार्यक्रम घोषित करावा, असे निवेदनात नमूद आहे.
शिष्टमंडळात केदार नाकाडे, चंदू लांजेवार, राजू घावळे, शिशुपाल भुरे, यशवंत भोयर, संजय मते, राजेश निंबार्ते आदी उपस्थित होते.