‘स्मार्ट सिटी’ बनविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2017 12:29 AM2017-02-09T00:29:41+5:302017-02-09T00:29:41+5:30

शहराला लागलेले अस्वच्छतेचे ग्रहण पुसून काढू.

Make 'smart city' | ‘स्मार्ट सिटी’ बनविणार

‘स्मार्ट सिटी’ बनविणार

Next

पदग्रहण समारोह : नगराध्यक्ष मेंढे यांची ग्वाही
भंडारा : शहराला लागलेले अस्वच्छतेचे ग्रहण पुसून काढू. येत्या पाच वर्षात शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी, गटार योजना यांचे भरीव कामे करुन शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्याचा संकल्प नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी व्यक्त केला.
‘स्मार्ट सिटी’ ही संकल्पना भंडारा शहरात राबविताना बेरोजगारांचा हाताला रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही विकास कामे खेचून आणू अशी ग्वाही मेंढे यांनी पदग्रहण समारंभ प्रसंगी दिली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित शहरातील एका सभागृहात ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी आमदार अनिल सोले, आमदार चरण वाघमारे, आमदार रामचंद्र अवसरे, भाजप जिल्हाध्यक्ष तारिक कुरेशी, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, डॉ. उल्हास फडके, रामभाऊ चाचेरे, युगकांता रहांगडाले, चंदु रोकडे, हेमंत देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी मेंढे यांनी, मतदारांनी नगराध्यक्ष पदावर निवड करुन माझ्यावर एक मोठी जबाबदारी सोपविली आहे. यासाठी बरेच कार्य करावे लागणार असल्याची जाणीव मला असून येत्या पाच वर्षात शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. नागरिकांनी भाजपवर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी माझे सर्व सहकारी नगरसेवक विकास कामे करण्यात कुठेही कमी पडणार नाही. शहर स्वच्छ व सुंदर करुन नागरिकांना नागरी आरोग्य पुरविण्यावर भर देवू.
शहरातील मुलभूत सुविधांपैकी पिण्याचे पाणी, रस्ता, गटार योजना यासह अन्य सुविधा पुरविण्यात आमचा भर राहणार आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारी योजना जुनी झाली असून काही ठिकाणी नव्याने पाईप लाईन टाकण्याची आता गरज आहे. स्वच्छ व आरोग्यास हितकारक असे शुध्द पाणी नागरिकांना मिळावे यासाठी उपायोजना करण्यात येईल. शहरातील घनकचरा निर्मुलन आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी गटार योजना राबवायची आहे. यातून प्रक्रिया करुन मिळालेल्या शुध्द पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य होईल. या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
शहरातील वेगवेगळ्या प्रभागात मुलांसाठी खेळांचे मैदान, बगीचा, वृध्दांसाठी विरंगुळा केंद्र, बेघर नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून घराचे बांधकाम करण्यात येईल असा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी वेबसाईटचे लोकार्पण आमदार अनिल सोले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या मदतीने शहरातील नागरिक आपली तक्रार थेट नगराध्यक्षांपर्यंत पोहचू शकतील.
यावेळी आमदार सोले यांनी, भंडारा शहराच्या विकासाकरिता शक्य ती मदत करणार असल्याचे सांगितले यावेळी उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाला शहरातील माजी नगरसेवकांसह विद्यमान नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन चैतन्य उमाळकर यांनी केले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Make 'smart city'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.