जिल्ह्यातील मालगुजारी तलाव निरूपयोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:44 PM2018-07-16T23:44:51+5:302018-07-16T23:46:43+5:30
पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस येत असला तरी जिल्ह्यातील माजी मालगुजार तलावात पाणी साठविण्याची योजना नाही. ऐकेकाळी हजारो एकर शेतीला सिंचनाची सोय करून देणारे मालगुजारी तलाव शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे निरूपयोगी ठरत आहेत. दरवर्षी तलावातील गाळ काढण्यासाठी योजना आखण्यात येते. काही तलावात ही योजना यशस्वी होते तर काही तलाव भ्रष्टाचारामुळे पोखरत आहे.
संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस येत असला तरी जिल्ह्यातील माजी मालगुजार तलावात पाणी साठविण्याची योजना नाही. ऐकेकाळी हजारो एकर शेतीला सिंचनाची सोय करून देणारे मालगुजारी तलाव शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे निरूपयोगी ठरत आहेत. दरवर्षी तलावातील गाळ काढण्यासाठी योजना आखण्यात येते. काही तलावात ही योजना यशस्वी होते तर काही तलाव भ्रष्टाचारामुळे पोखरत आहे.
जिल्ह्यात शंभर वर्षापुर्वी जलसंघटनाची मोठी योजना होती. त्या काळातील मालगुजारांनी लोकसहभागातून मालगुजारी तलावांची निर्मिती केली. तालुक्यात अशा मालगुजारी तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र या मालगुजारी शिवनीबांध, कुंभली, गुढरी येथील लघुप्रकल्पाशिवाय जुन्या तलावाची संख्या मोठी आहे. एकोडी, चांदोरी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, पाथरी, सावरगाव, खंडाळा, उमरी, लवारी, सितेपार, सानगडी, केसलवाडा या गावामध्ये माजी मालगुजारी तलाव आहेत. जिल्ह्यात लघुपाटबंधारे विभागा अंतर्गत असलेल्या अध्यक्ष, लघु व जुन्या मामा तलावांची संख्या ६४ टक्के आहे. मध्यम प्रकल्पात चार तर लघुकालव्याची संख्या ३२ आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील लधु दोन हजार २६७ मामा तलावापैकी १६०२ मामा तलाव भंडारा जिल्ह्यात आहेत. पूर्वी अशा तलावाची मालकी परिसरातील मालगुजाराकडे होती. मात्र १९५० च्या संपत्ती हक्क कायद्यानुसार हे मामा तलाव शासनाकडे गेले आहेत.
त्यामुळे तलावांचा सामान्य जनता व शेतकऱ्यांशी संबंध तुटला. महाराष्ट्र राज्य घोषित झाल्यानंतर शासनाने १९६३ मध्ये देखभाल व पाणीवाटप व्यवस्थापक करण्यासाठी नेमलेल्या बर्वे आयोगाच्या शिफारशीनुसार दुरूस्ती व पाणी वाटपावर पाणीकर आकारायचे ठरविण्यात आले. याला त्यावेळी जनतेनी विरोध केला होता. मात्र शासनाने त्याची दखल घेतली नाही. तेव्हापासून या तालुक्याची दुरावस्था झाली आहे.
जिल्हा परिषदेला लघु पाटबंधारे विभागाकडे आलेले मालगुजारी तलाव रोहयोच्या कामापुरते उरले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात भरलेला तलाव दोन महिन्यातच रिकामा होतो. शयाकडे सिंचनाबरोबरच जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. शासनाने तलाव ताब्यात घेतले मात्र देखभाल दुस्स्तीकडे दुर्लक्ष केले. शासनाने जर तलावाचे खोदकाम मातीकाम जिर्ण पर्यायी दुरूस्ती गाळ काढणे याकडे लक्ष देवून -- केल्यास तलावाचे भाग्य उजळू शकते अन्यथा जिल्ह्यातील तलाव फक्त नकाशावरच राहतील यात शंका नाही.
१५६ तलावांचे खोलीकरण
लघुपाटबंधारे उपविभाग साकोली अंतर्गत साकोली तालुक्यात २४८, लाखांदूर तालुका १९० व लाखनी तालुक्यात १२७ मामा तलावांची संख्या आहे. यापैकी यावर्षी गाळ काढून तलाव खोलीकरण करण्यात तलावांची संख्या १५६ एवढी असून यात साकोली तालुक्यात ५८ लाखनी तालुक्यातील ५२ व लाखांदूर तालुक्यात ४६ तलावांचा समावेश आहे. उपविभागात एकूण ५६५ तलावापैकी फक्त १५६ तलावांचे खोलीकरण करण्यात आले. उर्वरित तलावाचे काम कधी होणार याचा नेम नाही.
शासनाच्या योजनेनुसार तलावाची गाळ काढणे, खोलीकरण करणे हा उपक्रम सुरू आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे काम बंद असले तरी पुढच्यावर्षी पुन्हा नव्याने काम सुरू होतील.
-एस.एन. चाचेरे, प्रभारी उपविभागीय अभियंता.