गावामध्ये कुपोषण, शहरात अतिपोषण; कोरोनाकाळात मुलांचे वजन वाढले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:39 AM2021-09-06T04:39:20+5:302021-09-06T04:39:20+5:30
भंडारा : ग्रामीण भागात गरीब सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना पुरेसा सकस, पौष्टिक आहार मिळत नाही. यामुळे दिवसेंदिवस कुपोषणाचे प्रमाण वाढत ...
भंडारा : ग्रामीण भागात गरीब सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना पुरेसा सकस, पौष्टिक आहार मिळत नाही. यामुळे दिवसेंदिवस कुपोषणाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र शहरात याउलट स्थिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे गत दीड वर्षांपासून मुले घरातच आहेत. टीव्ही पाहणे आणि मोबाइलवर गेम खेळण्यातच मुले कित्येक तास घालवत आहेत. या काळात मैदानी खेळाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मुलांचे वजन वाढले असून त्यांचे अतिपोषण होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गामुळे गत दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुले घरातच आहेत. घरात राहून मुले कंटाळत असल्याने मोबाइल, टीव्ही पाहण्यात वेळ घालवतात. खाणे व टीव्ही मोबाइल असा दिनक्रम राहत आहे. अभ्यासक्रमही ऑनलाइन असल्याने घराबाहेर पडावे लागत नाही. त्यामुळे स्थूलता वाढत आहे. शिवाय इतर गंभीर आजारांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. मुलांना जंक फुड खाण्याची सवय लावू नये. त्यांना सकस आहार देण्याकडे लक्ष द्यावे. प्रथिनेयुक्त आहार द्यावा तरच रोग प्रतिकारकशक्ती टिकून राहील, असे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले आहे. जिल्ह्यातील कुपोषित बालकांची आकडेवारी लक्षात घेता दहा वर्षापूर्वीच्या आकडेवारीपेक्षा अत्यल्प असल्याचे दिसून येते.
पालकांची चिंता वाढली
मुले मोबाइल-टीव्ही समोरच बसून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खातात. टीव्ही पाहतानाच जेवण करतात. यात सगळे लक्ष टीव्हीकडे असते. मात्र त्यांना आपण किती खात आहोत याचे भान नसते. यातूनच कंबरेभोवती अनावश्यक चरबी वाढत आहे.
-वच्छला साखरे, पालक
कारणे काय?
शाळा बंद असल्याने मुले घरातच कोंडली गेली आहेत. टीव्ही-मोबाइलचा वापर वाढल्याने शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत.
मैदानी खेळाकडे दुर्लक्ष, शारीरिक शिक्षणाचे तास बंद आहेत. मैदा, तेलकट पदार्थ, जंकफुड खाणे वाढले आहे.
पोषण आहाराचा दुरुपयोग
कुपोषणमुक्तीसाठी शासन जनजागृती करून पोषण आहारावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. मात्र हे आहार लाभार्थी सेवन न करता जनावरांना देत असल्याचे काही परिसरात दिसून आले.
शहरात स्थूलता ही नवी समस्या
पालक लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देत असतात. अनेक पालक मुलांना मैदानी खेळ, कराटे, डान्स क्लास लावत असतात. त्यामुळे मुलांचे वजनही नियंत्रणात राहत असते. मात्र सध्या मुले घरात टीव्ही मोबाइलमध्ये व्यस्त असल्याने स्थूलता ही नवीन समस्या निर्माण झाली आहे.
कोरोना संकटकाळामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे मुले घरातच आहेत. मनोरंजनाची साधने म्हणून टीव्ही मोबाइलचा वापर वाढला आहे. पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात
मुले मोबाइल-टीव्हीसमोरच बसून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खातात. शरीराची हालचाल कमी होत आहे. त्यामुळे वजन वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. पौष्टिक आहार व व्यायाम गरजेचे आहे.
-यशवंत लांजेवार, बालरोगतज्ज्ञ भंडारा
मैद्याचे पदार्थ, जंकफुड खाण्याचे पदार्थ वाढले. व्यायामाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे स्थूलता वाढत आहे. भविष्यात आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. स्थूलतेमुळे चयापचय विकृती, थाॅयराईड, मधुमेह असे आजारही लहान मुलांमध्ये आढळून येत आहेत. योगा, व्यायाम गरजेचे आहे.
-डाॅ.देवेंद्र धांडे, लाखनी