तलवारीने ११ केक कापून साजरा केला वाढदिवस, अतिउत्साही युवकावर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 04:41 PM2023-05-29T16:41:30+5:302023-05-29T16:43:48+5:30
मोहाडी तालुक्यातील घटना
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : तलवारीने जाहीरपणे ११ केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या मोहाडी तालुक्यातील एका २७ वर्षीय युवकावर पोलिसानी गुन्हे नोंदविले आहेत. या घटनेमुळे त्याचा वाढदिवसाचा आनंद चिंतेत परावर्तीत झाला आहे.
तुमसर तालुक्यातील रोहा या गावात हा प्रकार घडला.
कमलेश बांडेबुचे असे नाव असलेल्या या युवकाचा २७ मे रोजी वाढदिवस होता. यासाठी रोहा येथील परमात्मा एक ट्रडर्स या दुकानात त्याने सजविलेल्या टेबलवर एक दोन नव्हे तर, तब्बल अकरा केक तलवारीने कापले. विशेष म्हणजे, या सर्व केकवर ‘कमलेश शेठ’ असे लिहिले होते. आपल्या मित्रमंडळांच्या उपस्थितीत आतशबाजी करीत त्याने रांगेत ठेवलेले केक तलवारीने कापून जल्लोष केला. एका मित्राने या घटनेचा मोबाईलवरून व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे कमलेश अडचणीत आला.
भंडारा - तलवारीने ११ केक कापून केला वाढदिवस, मोहाडी तालुक्यातील अतिउत्साही युवकावर पोलिसांची कारवाई pic.twitter.com/rXen8pRBFI
— Lokmat (@lokmat) May 29, 2023
हा व्हिडीओ पाहून पोलिसांनी या घटनेची दखल घेतली. पोलिसांच्या वतीनेच तक्रार दाखल करण्यात आली. त्याच्या दुकानात सोमवारी सकाळी झडती घेतली असता एक तलवार आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली आहे. त्याच्याविरूद्ध अनधिकृतपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप अटक मात्र झालेली नाही.