स्वच्छंदी मनाचा कलदार माणूस हरपला
By admin | Published: April 9, 2017 12:28 AM2017-04-09T00:28:40+5:302017-04-09T00:28:40+5:30
पूर्व विदर्भात मराठी वाचन संस्कृतीला आणि साहित्य अभिरूचीला समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व ही प्रा.कृष्णा चौधरी यांची खरी ओळख होती.
विदर्भ साहित्य संघाचा कार्यक्रम : प्रा.कृष्णा चौधरी यांना श्रद्धांजली
भंडारा : पूर्व विदर्भात मराठी वाचन संस्कृतीला आणि साहित्य अभिरूचीला समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व ही प्रा.कृष्णा चौधरी यांची खरी ओळख होती. त्यांच्या निधनामुळे एक श्रेष्ठ वाड:मयसेवक व स्वच्छंदी मनाचा कलदार माणूस गमावला आहे, अशी शोकसंवेदना भंडारा येथे कृष्णा चौधरी यांच्या श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली.
विदर्भ साहित्य संघ शाखा भंडारा, युगसंवाद वाङ्मयीन व सांस्कृतिक संस्था व सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात प्रा.कृष्णा चौधरी यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे हे होते.
यावेळी प्रमोदकुमार अणेराव म्हणाले, कृष्णा चौधरी हे सभोवतीच्या जीवनाची व साहित्यातील सौंदर्याची मीमांसा करणारे एक गंभीर समीक्षक होते. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी साहित्यातील एक व्यासंगी व तरल प्रतिभेचे श्वेतकमळ निमाले आहे. अमृत बन्सोड म्हणाले, फुले-आंबेडकरी चळवळीतील प्रा.कृष्णा चौधरी यांच्या सहभागाच्या आठवणी सांगितल्या. डॉ.अनिल नितनवरे म्हणाले, वाङ्मयाच्या आणि मराठी अध्यापनाच्या साधनेसाठी आपल्या आयुष्याचे मोल देणारा मन:पूत शैलीने जगलेला एक कलदार माणूस म्हणजे कृष्णा चौधरी होते.
समारंभाध्यक्ष डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे यांनी विदर्भातील वाङ्मय प्रसाराच्या क्षेत्रातील कृष्णा चौधरींच्या कर्तृत्वाचा मागोवा घेतला. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात निखळ वाङ्मयीन, सांस्कृतिक विचारमंथन घडविणारी एक व्याख्यानमाला प्रा.कृष्णा चौधरी यांच्या स्मरणार्थ सातत्याने राबविणे हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे सांगितले.
शोकसभेच्या प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेचे संचालन प्रा.नरेश आंबिलकर यांनी केले. यावेळी प्रा.राकेश रामटेके, बासप्पा फाये, घनश्याम कानतोडे, खोब्रागडे, साखरवाडे, सार्वजनिक वाचनालय, विदर्भ साहित्य संघ व युगसंवादाचे कार्यकारी सदस्य उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)