सैतान संचारला, डोक्यात लाकडी पाट घालून ‘त्याने’ पत्नीलाच संपविले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 11:39 AM2023-08-30T11:39:20+5:302023-08-30T11:41:42+5:30
भल्या पहाटे झाला थरार : जीवघेणा हल्ला करून पती झाला पसार
लाखनी (भंडारा) : सर्वजण साखरझोपेत असताना भल्या पहाटे ४ वाजता पती-पत्नीमध्ये वाद झाला. तो एवढा विकोपाला गेला की पतीने लाकडी पाटच तिच्या डोक्यात घातला. वर्मी घाव बसल्याने ती रक्तबंबाळ होऊन कोसळली. हे पाहून पतीने घरातून पळ काढला. मात्र उपचारादरम्यान पत्नीचा नागपुरात मृत्यू झाला. ही घटना लाखनी तालुक्यातील सेलोटी या गावात घडली.
मृत पत्नीचे नाव भारती भारत चाचेरे (४०) असून क्रूरकर्मा पतीचे नाव भारत (४५) असे आहे. या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून क्षुल्लक कारणांवरून किरकोळ वाद आणि कुरबूर सुरू असायची. मंगळवारी (ता. २९) पहाटे ४ वाजताच्या सुमारास या दोघांमध्ये वाद झाला. या वादात ती स्वयंपाकघरात गेली. तिच्या पाठोपाठ जात त्याने घरातच पडलेला लाकडी पाटाचा जोरदार प्रहार तिच्या डोक्यावर केला. यामुळे खोलवर जखम झाल्याने रक्तबंबाळ होऊन ती बेशुद्ध होऊन पडली. यानंतर भारतने पळ काढला.
दरम्यान, मुले झोपून उठली तेव्हा त्यांना आई रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. मुलांनी शेजाऱ्यांच्या मदतीने तिला लगेच उपचारासाठी लाखनी येथे नेले. परंतु प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात व नंतर नागपुरात नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आपल्या आईच्या हत्येची तक्रार खुशी नामक १६ वर्षीय मुलीने लाखनी पोलिसात नोंदविली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळाला पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, पोलिस उपनिरीक्षक देवीदास बागडे आदींनी भेट दिली. भारतच्या तपासासाठी पोलिसांनी शोध सुरू केला असून पोलिसांचे पथक रवाना केले आहेत.
सर्वांदेखत भारतने काढला पळ
या दांपत्याला दोन मुले आहेत. या चौघांव्यतिरिक्त कुटुंबात कुणीच नाही. रोज सकाळी लवकर ते सर्वजण पूजेसाठी उठत असत. घटनेच्या दिवशी मुले उठली असता आई रक्तबंबाळ होऊन पडलेली दिसली. यावेळी वडील भारतही घरीच होता. मुलींनी हे दृश्य पाहून आरडाओरड आणि रडारड केली. त्यामुळे शेजारच्या लोकांनी धाव घेतली. या दरम्यान सर्वांदेखत भारतने घरातून पळ काढला.
भारती करायची मंगल कार्यालयात काम
या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत गरिबीची आहे. भारत हा गवंडीकाम करायचा. तर, संसाराला मदत व्हावी म्हणून भारती लाखनीमधील एका मंगल कार्यालयात रोजीने कामाला जात असे. या घटनेचे कारण अद्यापही कळलेले नाही.