वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, लाखांदूर तालुक्यातील दुसरी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2022 05:53 PM2022-04-05T17:53:10+5:302022-04-05T17:56:31+5:30
आज सकाळच्या सुमारास तो जंगल परिसरात मोहफूल वेचण्यासाठी गेला होता. दरम्यान, जंगलातील झुडपात शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या एका वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला.
लाखादूर (भंडारा) : सकाळी जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या एका जणाला वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना आज (दि. ५) दुपारी २ च्या सुमारास तालुक्यातील इंदोरा ते अरुणनगर मार्गावरील जंगल परिसरात उघडकीस आली. यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जयपाल घोगलु कुंभरे (वय ४०, रा इंदोरा) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाघाच्या हल्ल्यात इसम ठार होण्याची ही लाखांदूर तालुक्यातील दुसरी घटना आहे. प्राप्त माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास तो जंगल परिसरात मोहफूल वेचण्यासाठी गेला होता. दरम्यान, जंगलातील झुडपात शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या एका वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. यावेळी वाघ त्याला तब्बल २०० मीटर अंतरावर फरफटत नेत त्याचा ऊजवा पाय फस्त केला.
दरम्यान, सकाळच्या सुमारास मोहफूल वेचायला गेलेला जयपाल दुपारी होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी जंगल परिसरात त्याचा शोध घेतला असता त्यांना जयपालचा मृतदेह आढळून आला. याची माहिती स्थानिक लाखांदूर वन विभागासह पोलिस प्रशासनाला देण्यात आली. यानंतर पोलिसांसह वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
दरम्यान, ही तालुक्यातील ही दुसरी घटना अल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी दहेगाव जंगलात सरपण गोळा करण्यासाठी सकाळच्या सुमारास गेलेल्या एका ५४ वर्षीय व्यक्तीला वाघाने हल्ला करुन ठार केले होते. तर, आज वाघाने पुन्हा एकाचा बळी घेतल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून नरभक्षी ठरलेल्या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.