अति मद्यप्राशनाने गेला जीव, प्रवासी निवाऱ्यातच झाला बेवारस मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 05:37 PM2023-06-17T17:37:04+5:302023-06-17T17:38:33+5:30
मागील आठ ते दहा दिवसांपासून तो गावातील प्रवासी निवाऱ्यातच मुक्कामी होता.
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : अति मद्यप्राशनाची जडलेली सवय, त्यात उन्हाळ्याचे दिवस यामुळे येथील बसस्टँडवर ४८ वर्षीय व्यक्तीचा बेवारसपणे मृत्यू झाल्याची घटना साकोली तालुक्यातील दिघोरी मोठी येथे शनिवारी, १७ जूनला सकाळी उघडकीस आली. दीपक चरणदास वैद्य (सासरा, ता. साकोली) असे या व्यक्तीचे नाव आहे.
दिघोरी मोठी येथील एका बारमध्ये तो मागील अनेक वर्षापासून वेटर म्हणून काम करायचा. मात्र मागील आठ ते दहा दिवसांपासून तो गावातील प्रवासी निवाऱ्यातच मुक्कामी होता. त्याला मागील काही दिवसात दारूचे प्रचंड व्यसन जडले होते. दिवसभर तो दारूच्या नशेतच असायचा. अशातच गावातील प्रवासी निवाऱ्यात तो दारूच्या नशेत मुक्कामी असल्याने त्याच्या अन्नपाण्याची आबाळ झाली. तरीही मद्यपान करणी सुरूच होते. यावच दरम्यान, अतिरिक्त मद्यप्रशन आणि उन्हामुळे त्याचा मृत्यू झाला.
शनिवारी सकाळी प्रवासी निवाऱ्यात गावकऱ्यांना त्याचा मृतदेह आढळून आला. ही घटना नागरिकांच्या निदर्शनास येताच दिघोरी पोलिस स्टेशनमध्ये माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थई येऊन पंचनामा केला आणि नातेवाईकांना कळवून प्रेत शविच्छेदनासाठी लाखांदूर येथे पाठविले. पुढील तपास ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.