पहिलीचा बाळंतपणात मृत्यू, दुसरी गेली सोडून; तिसरीचा गळा आवळून 'त्याने' केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 04:10 PM2022-03-24T16:10:25+5:302022-03-24T16:18:24+5:30

पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने दुसरा विवाह केला मात्र, तीही त्याला सोडून निघून गेली. मग त्याने तिसरे लग्न केले. मात्र, ती चांगली वागत नाही म्हणून त्याने तिचा गळा आवळून खून केला. यानंतर स्वत:ही विषप्राशन करून आत्महत्या केली.

man murderes wife and then commits suicide in sakoli tehsil | पहिलीचा बाळंतपणात मृत्यू, दुसरी गेली सोडून; तिसरीचा गळा आवळून 'त्याने' केली आत्महत्या

पहिलीचा बाळंतपणात मृत्यू, दुसरी गेली सोडून; तिसरीचा गळा आवळून 'त्याने' केली आत्महत्या

Next
ठळक मुद्देसाकोली तालुक्यातील पळसपानी येथील घटनादोन वर्षाची चिमुकली झाली पोरकी

भंडारा : पहिल्या पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाला. त्यानंतर दुसरा विवाह केला. ती अर्ध्यातच साथ सोडून निघून गेली. तिसरे लग्न केले, तर पत्नी चांगली वागत नाही म्हणून तिचा गळा आवळून खून केला. यानंतर पतीनेही विषप्राशन करून आत्महत्या केली. साकोली तालुक्यातील पळसपानी येथील एका संसाराची अशी वाताहत झाली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली.

चरणदास सुखराम राऊत (४०) याने पत्नी पपीता हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर चरणदासनेही विषप्राशन केले. त्याचाही मंगळवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. पपीता ही चरणदासची तिसरी पत्नी होती. मजुरीवर कुटुंबाची गुजराण करणाऱ्या चरणदासची तीन लग्ने झाली होती. पहिला विवाह २००३ साली झाला. परंतु, साडेतीन वर्षांतच बाळंतपणात पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर २००७ मध्ये चरणदासने दुसरा विवाह केला. आठ वर्षे ते एकत्र राहिले. परंतु, मूलबाळ होत नसल्याने २०१५ मध्ये दुसरी पत्नीही त्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून गेली. त्यामुळे चरणदास एकटाच राहत होता. आई-वडील, भाऊ असले तरी तो वेगळा राहायचा.

तीन वर्षे एकटाच राहून त्याने २०१८ मध्ये घानोड (आमगाव) येथील पपीतासोबत विवाह केला. या दोघांना एक मुलगी झाली. तिचे नाव सृष्टी असून ती आता दोन वर्षांची आहे. गत रविवारी पपीताचा संशयास्पद मृतदेह स्वयंपाकखोलीत आढळून आला होता, तर चरणदासने बहिणीच्या गावी जाऊन विष घेतले होते. शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने पपीताचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून मंगळवारी खुनाचा गुन्हा चरणदासवर नोंदविण्यात आला. दरम्यान, नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एका कुटुंबाची अशी वाताहत झाली.

सृष्टी झाली निराधार

तिसरी पत्नी पपीतापासून चरणदासला मुलगी झाली. तिचे नाव सृष्टी असून आता ती दोन वर्षांची आहे. मात्र, आईचा खून आणि वडिलाने विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे दोन वर्षांची निरागस चिमुकली निराधार झाली आहे. पळसपानी येथे चरणदास आपल्या परिवारासह आई-वडिलांपासून वेगळा राहत होता. आता सृष्टीला सांभाळण्याची जबाबदारी चरणदासच्या वृद्ध आई-वडिलांवर आली.

Web Title: man murderes wife and then commits suicide in sakoli tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.