मनुष्याने जीवनात अध्यात्माचा आधार घ्यावा
By admin | Published: August 13, 2016 12:20 AM2016-08-13T00:20:03+5:302016-08-13T00:20:03+5:30
अध्यात्म मानवाला सात्विक विचार करण्यास प्रवृत्त करतो त्यामुळे प्रत्येकाने जीवनात अध्यात्माचा आधार घ्यावा, ..
रजनी मोटघरे यांचे प्रतिपादन : नरेंद्रचार्य महाराज सेवा केंद्र समितीचे सामूहिक अखंड पारायण
पवनी : अध्यात्म मानवाला सात्विक विचार करण्यास प्रवृत्त करतो त्यामुळे प्रत्येकाने जीवनात अध्यात्माचा आधार घ्यावा, असे प्रतिपादन नगराध्यक्ष रजनी मोटघरे यांनी व्यक्त केले.
स्थानिक गांधी भवनात स्वामी श्री नरेंद्राचार्य महाराज सेवाकेंद्र समितीतर्फे सामूहिक अखंड पारायण सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. पुरूष व महिला साधकांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून अखंड पारायण केले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्षा रजनी मोटघरे अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख अतिथी पालिका उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर, माजी पं.स. सदस्य मोहन पंचभाई, शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर उरकुडकर, संदीप नंदरधने, अशोक पारधी, ग्रंथवाचक ज्ञानेश्वर भुरे, श्रीधर वैद्य, कार्यक्रमाचे यजमान जयपाल वंजारी उपस्थित होते.
प्रकृती सुदृढ राहण्यासाठी विज्ञान आध्यात्म दोन्हीही गरज आहे. स्वामी नरेंद्राचार्य महाराजांनी सामाजिक उपक्रमाद्वारे लोकसेवा सुरू केली त्याचा परिणाम म्हणून व्यसनमुक्त समाज निर्माण होत आहे, असे मत डॉ. विजय ठक्कर यांनी व्यक्त केले. अपंगाचे कल्याण त्यांना मदतीचा हात, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, रक्तदान शिबिर या माध्यमाद्वारे सेवा केंद्र समितीतर्फे समाजसेवा घडत असल्याचे मत मोहन पंचभाई यांनी व्यक्त केले. कोणत्याही धर्म वा धर्माचे तत्व वाईट नाही माणूस त्या धर्माचा वापर कसा करतो, यावरून धर्म चांगला किंवा वाईट हे ठरू शकत नाही, असे मत अशोक पारधी यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक विणू नरेश लांजेवार यांनी केले. संचालन धनंजय भुरे यांनी तर आभार रूपलता वंजारी यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी सेवाकेंद्र समिती पवनी व भक्तगणांनी प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)