ताेतया आयकर अधिकाऱ्याने घातला सराफाला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 05:48 PM2021-10-01T17:48:56+5:302021-10-01T17:57:57+5:30
आयकर अधिकारी असल्याचे सांगत एकाने भंडाऱ्यातील एका सराफाला एक लाख ८० हजार रुपयांनी गंडवले. ही लुट त्याने ऑनलाईन पद्धतीने माेबाईलवरून पैसे पाठविल्याचा स्क्रीन शाॅट दाखवून केली.
भंडारा : आयकर अधिकारी असल्याची बतावणी करून साेने खरेदी करून भंडारा शहरातील एका सराफाला एक लाख ८० हजार रुपयांचा गंडा घालण्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी भंडारा येथील अनादिनारायण ज्वेलर्समध्ये घडली. याप्रकरणी भंडारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
येथील मेन लाईनमध्ये कमला हाऊसमध्ये अनादिनारायण ज्वेलर्स आहे. करण नितीन साेनी यांचे हे सराफा दुकान आहे. गुरुवारी २ वाजताच्या सुमारास त्यांच्या दुकानात एक व्यक्ती आला. त्याने आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगितले. साेने खरेदी करायचे आहे, असे सांगत त्याने साेन्याची चेन व अंगठीची पाहणी केली.
साेन्याची चेन व दाेन अंगठ्या वजन २७.४९ ग्रॅम खरेदी केल्या. एकूण किमतीपैकी एक लाख ८० हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने माेबाईलवरून करण साेनी यांच्या माेबाईलवर पाठविले. पैसे पाठविल्याचा स्क्रीन शाॅटही दाखविण्यात आला. त्यावर विश्वास ठेवून २५.४९० ग्रॅम साेन्याची चेन देण्यात आली तर अंगठ्या रविवारी घेऊन जाईन, असे सांगितले. खरेदीचे बिलही रविवारीच घेऊन जाईल, असे सांगून ताे निघून गेला.
काही वेळाने साेनी यांनी आपल्या अकांऊंटंटचे स्टेटमेंट चेक केले असता, त्यात काेणतीच रक्कम जमा झाली नसल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी त्याचा शाेध घेतला, परंतु ताे आढळून आला नाही. अखेर रात्री भंडारा पाेलीस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली. त्यावरून पाेलिसांनी ताेतया आयकर अधिकारी संताेष पी. अशा नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फसवणुकीचा नवा फंडा
माेबाईल ॲपच्या माध्यमातून पैशाची ऑनलाईन देवाणघेवाण माेठ्या प्रमाणात केली जात आहे. वेळेची बचत आणि कॅशलेस व्यवहार हाेत असल्याने अनेक जण याचा उपयाेग करतात. मात्र आता पैसे पाठविल्याचा स्क्रीन शाॅट दाखवून लुटण्याचा हा नवा फंडा भंडारा शहरात उघडकीस आला. पाेलीस आता या भामट्याचा शाेध घेत आहेत.