पंगतीत कढी संपली सांगणे तरुणाला महागात पडले, वाढपींंनी बदडून काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 16:43 IST2022-03-15T16:27:11+5:302022-03-15T16:43:53+5:30
लग्न मंडप पूजन कार्यक्रमाच्या पंगतीत भाेजन करताना कढी संपल्याचे सांगणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. वाढणाऱ्या मुलांनी वाद घालून काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

पंगतीत कढी संपली सांगणे तरुणाला महागात पडले, वाढपींंनी बदडून काढले
भंडारा : लग्नात कढी असायलाच हवी.. असा जणू अखिलित नियमच आहे. कढी लोकांच्या इतकी जिव्हाळ्याची आहे की तिला काही ठिकाणी सुंदरीही म्हणतात. मात्र, या कढीप्रेमापायी लग्नसमारंभात हाणामारी झाली व प्रकरण चक्क ठाण्यापर्यंत पोहोचले.
लग्न मंडप पूजन कार्यक्रमाच्या पंगतीत भाेजन करताना कढी संपल्याचे सांगणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. वाढणाऱ्या मुलांनी वाद घालून काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी परस्परांविरुद्ध कारधा ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
आशिष रवींद्र वंजारी (२६, रा. टेकेपार पुर्नवसन ता. भंडारा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ताे रविवारी आपले चुलत काका अशाेक वंजारी यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभात गेला हाेता. मंडप पूजनाच्या पंगतीत ताे जेवण करायला बसला. त्यावेळी त्याने वाढणाऱ्या मुलांना कढी संपली असे सांगितले. त्यावरून एवढ्या जाेराने कशाला ओरडताे असे म्हणत कार्तिक तेजराम वंजारी याने वाद घातला. मी म्हणणार.. कशी संपली कढी म्हणत त्यांच्यात जुंपली. या वादात कार्तिक व त्याचे वडील तेजराम गाेविंदा वंजारी या दाेघांनी काठीने आशिषला चांगलीच मारहाण केली.
याप्रकरणी कारधा पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार साठवणे करीत आहे. तर याचप्रकरणी स्नेहा कार्तिक वंजारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आशिष वंजारी याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार साठवणे करीत आहे.