जि.प.त रंगले साडेतीन तासांचे ‘मानापमान’ नाट्य

By Admin | Published: March 22, 2016 12:42 AM2016-03-22T00:42:31+5:302016-03-22T00:42:31+5:30

जिल्हा परिषदेत सत्तेसाठी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससोबत हात मिळवणी केली.

'Manapaman' theatrical drama of three and a half hours played in ZP | जि.प.त रंगले साडेतीन तासांचे ‘मानापमान’ नाट्य

जि.प.त रंगले साडेतीन तासांचे ‘मानापमान’ नाट्य

googlenewsNext

प्रकरण काम वाटपाचे : राष्ट्रवादीचा भोजनावर बहिष्कार, सर्व सदस्यांसोबत बंदद्वार चर्चा, पुन्हा एकदा कामांचे लॉलिपॉप
प्रशांत देसाई भंडारा
जिल्हा परिषदेत सत्तेसाठी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससोबत हात मिळवणी केली. मात्र, विकास कामात सहकाऱ्यांना डावलल्याने त्यांच्यात धूसफुस सुरू होती. याबाबत ‘लोकमत’चे वृत्त प्रकाशित होताच काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. दरम्यान सोमवारला जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर होणार होता. यापूर्वी काँग्रेसने ठेवलेल्या भोजनावर नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला. सर्व सदस्यांसोबत बंदद्वार चर्चा केल्यानंतर या ‘मानापमान’ नाट्यवर साडेतीन तासानंतर पडदा पडला.
मागील पाच वर्ष काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष जिल्हा परिषदच्या सत्तेबाहेर होते. मागीलवर्षी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. त्यांनी सत्ता काबीज करण्यासाठी व भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रस, अपक्ष व शिवसेनेच्या सदस्यांना हाताशी घेऊन काँग्रेसने हातावर घड्याळ बांधून सत्ता संपादन केली. दरम्यान सत्तेत सहभागी सदस्यांना त्यांच्या क्षेत्रात विकास कामे सर्वाधिक देण्याचा तोंडी करार झाला.
आॅक्टोबर महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन सर्वांकडून विकास कामांचे प्रस्ताव मागितल्या गेले. मात्र, काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तेत सहकारी असलेल्यांना कमी लेखून कामापासून दूर ठेवले व भाजपच्या काही सदस्यांना कामांचे वाटप केले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांसह सहकारी सदस्यांमध्ये धूसफुस सुरू होती.
याबाबत ‘मर्जीतील सदस्यांना कामांचे वाटप’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले. आज जिल्हा परिषदेचा वार्षिक अंदाजपत्रक सादर होणार होता. या वृत्तामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. कामापासून वंचित ठेवल्याने राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य सत्ताधारी सदस्यांनी वेगळी चूल मांडली. त्यामुळे सर्वसाधारण सभेत पितळ उघडे पडेल या भितीने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सर्व सदस्यांची बंदद्वार मनधरणी करून पुन्हा एकदा त्यांना कामाचे लॉलीपाप दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा भोजनावर बहिष्कार
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांनी त्यांच्या सर्व सदस्यांसोबत सकाळी ११ वाजता तातडीची बैठक बोलविली. डोंगरे यांच्या कक्षात सर्व सदस्यांनी काँग्रेवर शरसंधान साधले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सदस्यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी उपाध्यक्ष डोंगरे यांच्या कक्षात गेले. यावेळी असंतुष्ट सदस्यांसोबत बंदद्वार चर्चा करून त्यांची मनधरणी करण्यात आली. मात्र, त्यांनी काँग्रेसच्या भोजनावर बहिष्कार टाकला.
अडीच तास चालले मानापमान नाट्य
काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक अध्यक्षांच्या पुढाकारात घेण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेस व सत्तेत सहभागी सदस्यांची मनधरणी करण्याची रणनिती आखण्यात आली. त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी उपाध्यक्षांचा कक्ष गाठून सदस्यांची मनधरणी करण्यात आली. यावेळी सर्व सदस्यांना कामातून डावलण्यात आल्याची चुकी मान्य करीत सर्वांना समान कामे देण्याचे लॉलीपाप दिले. यानंतर तिढा सुटला. सकाळी ११ ते दुपारी अडीच असे हे मानापमान नाट्य रंगले. या नाट्यामुळे एक वाजताची सर्वसाधारण सभा पहिल्यांदा दुपारी अडीच वाजता सुरू झाली.

भाजपाला आयते कोलित
काँग्रेसने सत्तेतील सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य सदस्यांना विश्वासात न घेता कामांमध्ये कुरघोडी केली. यामुळे दोघांमध्ये शीतयुध्द सुरू होते. या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले. यामुळे विरोधात असलेल्या भाजपाला सर्वसाधारण सभेसाठी आयते कोलित मिळाले. कामे वाटपाच्या मुद्यावरून भाजपाच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच जेरीस आणले. जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. ही सभा रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: 'Manapaman' theatrical drama of three and a half hours played in ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.