मांडवी ते ढिवरवाडा जंगलात दुचाकीस्वारास लुटण्याचा प्रयत्न, १० ते १२ मुसकेधारी युवकांचा समावेश
By युवराज गोमास | Published: April 25, 2023 03:49 PM2023-04-25T15:49:17+5:302023-04-25T15:50:49+5:30
परत फिरला अन् थोडक्यात बचावला
भंडारा : मोहाडी व भंडारा तालुक्याच्या सीमेत असलेल्या मांडवी ते ढिवरवाडा कोका वन्यजीव अभयारण्य जंगल क्षेत्रात दहा ते बारा मुसकेधारी युवकांनी रस्ता अडवून एका तरुणाला लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रसंगावधान राखून तो वेळीच काही अंतरावरून माघारी फिरला. त्यामुळे त्यावर दगडांचा मारा केल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या घटनेत मोहाडी तालुक्यातील पांजरा (बोरी) येथील गिरधारी गांधी तितीरमारे हा तरुण थोडक्यात बचावला.
मोहाडी व भंडारा तालुक्याच्या सीमेत कोका अभयारण्याचे घनदाट जंगल आहे. सध्या उन्हाळ्याचे व लग्नसराईचे दिवस असल्याने रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. शिवाय हा जिल्हा मार्ग असल्याने दवाखाना, विविध शासकीय व खासगी कामानिमित्त रात्री-बेरात्री आवागमन सुरू असते. परंतु महिन्याभरापासून चोरांच्या दहशतीमुळे सायंकाळ होताच मांडवी ते ढिवरवाडा रस्ता सुनसान होतो. माहिती असलेले नागरिक येथून प्रवास करण्याचे टाळतात.
करडी व कारधा पोलिसांची पेट्रोलिंग सुरू असताना त्यांना एकदाही संशयास्पद हालचाली अथवा इसम आढळून आलेले नाहीत. त्यामुळे ती अफवा तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु रविवारी घडलेल्या घटनेमुळे पुन्हा या भागात चोरांची दहशत माजली आहे.
रविवारी रात्री दहाच्या सुमारास पांजरा येथील तरुण गिरधारी गांधी तितीरमारे हा दुचाकीने गावाकडे येत असताना मांडवी ते ढिवरवाडा जंगलादरम्यान दहा ते बारा मुसके बांधलेल्या तरुणांनी रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच काही अंतरावरून त्याने दुचाकी वळविली व मांडवीला पोबारा केला. त्यावेळी त्या तरुणांवर काही दगडही फेकून मारले गेले. परंतु सुदैवाने एकही दगड त्यास लागला नाही. मांडवी येथे जाऊन त्याने ही हकीकत सांगितली. त्यावेळी ढिवरवाडा व मांडवी येथील शंभर ते दीडशे नागरिकांनी घटनास्थळ गाठत शोधाशोध केली. परंतु चोर मिळून आले नाहीत. या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
रविवारी घटनेची माहिती होताच शोधमोहीम राबविली. मात्र, कुणीही मिळून आले नाही. कारधा पोलिसांची मांडवी येथील तरुणांच्या मदतीने गस्त सुरू आहे. परंतु एकदाही संशयास्पद प्रकार दिसून आला नाही. करडी पोलिसांनीसुद्धा जंगल परिसरापर्यंत गस्त वाढवावी.
- चंद्रकांत काळे, ठाणेदार, कारधा